वाळूज महानगर: वाळूज महानगर परिसरातील विविध ठिकाणी ६ महिन्यांत घडलेल्या अपघातांत २८ जणाचा बळी गेला असून, यात २५ पुरुष तर ३ महिलांचा समावेश आहे. तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा अपघाताचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे आकडेवरील दिसून येते.
वाळूज महानगर परिसरात वाढत्या अपघाताच्या घटना लक्षात घेवून पोलीस प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात असून, नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. तरीही वाहनांची वाढती संख्या व बेशिस्त वाहतुकीमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच आहे.
जानेवारी ते जून या सहा महिन्यांत विविध ठिकाणी झालेल्या २६ अपघातांच्या घटनांत २८ नागरिकांचा बळी गेला असून, ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गतवर्षभरात अपघातांच्या घटनांत २८ जणांचा मृत्यू झाला होता. यात जानेवारी ते जून या ६ महिन्यांत १२ तर जुलै ते डिसेंबर या काळात १६ जणांचा मृत्यू झाला होता.
वाळूज महानगरातून औरंगाबाद-नगर व मुंबई-नागपूर हे दोन महामार्ग जातात. या महामार्गावर अवजड व इतर वाहनांची वर्दळ असते. अवजड वाहने, बेदरकार वाहनचालक व बेशिस्त वाहतूक यामुळे सारख्या अपघाताच्या घटना घडत असून, यात नाहक निष्पाप लोकांचा बळी जात आहे.
वाढत्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेसह नागरिकांना कठोर भूमिका घेवून स्थानिक पातळीवर अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.