उस्मानाबाद : सराफा व्यापाऱ्यास मारहाण करून लूटल्या प्रकरणात शहर पोलिसांनी आणखी १५० ग्रॅम सोनं, २८ हजार १०० रूपयांसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे़ आजवर पोलिसांनी ६०० ग्रॅम सोन्यासह एक लाख, ४० हजार रूपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला आहे़मुंबई येथील सराफा व्यापारी मुकेश मेहता यांना ४ आॅगस्ट रोजी शहरातील येमाई मंदिराजवळ चार-पाच युवकांनी मारहाण करून लूटले होते़ याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून बुधवारी चार स्केचही जारी केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि माधव गुंडिले, पोउपनि भास्कर पुल्ली, दरोडा प्रतिबंधक पथकाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ६ आॅगस्ट रोजी शहरातील भानुनगर भागात राहणाऱ्या तरूणांनी या व्यापाऱ्यास लुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी गुरूवारी रात्री भानुनगर भागात सापळा लावला. यावेळी त्यांनी प्रवीण नामदेव राठोड, सूरज चंद्रकांत नाईक, पवन रघुनाथ टेहरे व एक अल्पवयीन अशा चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता या चौघांनीही अन्य दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे कबूल केले. यावरून त्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १ लाख १४ हजार ८०० रूपये रोख व १२ लाख ५१ हजार ६०० रूपये किंमतीचे दागिने असा एकूण १३ लाख ६६ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ शहर पोलिसांनी या प्रकरणात आणखी दोघांना अटक केली आहे़ त्यांच्याकडून सोमवारी एक दुचाकी, १५० ग्रॅम सोनं, २८ हजार १०० रूपये जप्त केले़ या प्रकरणात आता एकूण ६०० ग्रॅम सोन्यासह १ लाख, ४२ हजार ९०० रूपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत़ उर्वरित सोन्यासह लाखो रूपयांची रोकड हस्तगत होण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे़ (प्रतिनिधी)
१५० गॅ्रम सोन्यासह २८ हजार जप्त
By admin | Published: August 13, 2014 12:26 AM