औरंगाबाद : जिल्ह्यात लसीकरण सुरू होऊन तीन महिने पूर्ण होत आहेत. या तीन महिन्यांच्या कालावधीत २ लाख ८५ हजार लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, यात आतापर्यंत ८.५९ टक्के म्हणजे २४ हजार ५६० लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे ३ महिन्यांच्या लसीकरणात जेमतेम २४ हजार नागरिकांत प्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकली. विशेष म्हणजे ज्यांना सर्वात आधी कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली होती. परंतु तीन महिन्यांत केवळ ४५.१७ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनीच दुसरा डोस घेतला आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लस देण्यात आली. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. पुढील टप्प्यात ६० वर्षांवरील, विविध आजार असलेल्या ४५ वर्षांवरील आणि नंतर ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येऊ लागली. गेल्या ३ महिन्यांत जिल्ह्यात कोरोना लसीचे ३ लाख १० हजार १५७ डोस आतापर्यंत देण्यात आलेले आहेत. यात पहिल्या डोसचे प्रमाण २ लाख ८५ हजार ५९७ इतके आहे. तर दुसऱ्या डोसचे प्रमाण २४ हजार ५६० आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर किमान १५ ते १६ दिवसांनंतर प्रतिकारशक्ती तयार होते, असे सांगितले जाते. त्यामुळे ही प्रतिकाशक्ती तयार होण्यापासून नागरिक अद्यापही दूर असल्याची स्थिती आहे.
----
लसीकरणाची स्थिती
आरोग्य कर्मचारी
पहिला डोस- ३३,९४५
दुसरा डोस-१५,३३५
-----
फ्रंटलाइन वर्कर्स
पहिला डोस- ४२,७८३
दुसरा डोस- ५,६९०
--------
४५ वर्षांवरील नागरिक
पहिला डोस- १,०३,६७२
दुसरा डोस- १,४०८
----
६० वर्षांवरील नागरिक
पहिला डोस- १,०५,१९७
दुसरा डोस- २,१२७
---