- अमेय पाठकछत्रपती संभाजीनगर: आमच्यावर जर अन्याय झाला, आरक्षण दिले गेले नाही, आमच्या मागण्यांची पूर्ण अंबलबजावणी झाली नाही तर आमच्या पुढे पर्याय आहे. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं हे आम्ही वारंवार सांगतो. जर त्यांना हे कळत नसलं तर आमच्या पुढे गोरगरिबांना सत्तेत पाठविण्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी मांडली. शहरातील एका खाजगी रुग्णालयात जरांगे उपचार घेत आहेत. आज सकाळी रुग्णालयातून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, गोरगरीब, वंचित, गरजवंत यांना मोठे करायचा असेल तर आपण एका विचाराने एकत्र आलं पाहिजे. आम्ही सर्वसामान्य गोरगरिबाच्या बाजूने ही लढाई करणार. त्यांच्यावर अन्याय होऊ नये त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही शंभर टक्के लढणार. १४ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत राज्यातल्या सर्व मतदारसंघातल्या बांधवांनी माहिती सोबत आणायची आहे. प्रत्येक मतदारसंघात किती मतदार आहेत, काय परिस्थिती आहे, आपण आधी काय केलेले, याबाबत यावेळी चर्चा होणार. त्यानंतर कोणता समाज, कोणती जात सहभागी होणार, कोणते मोठे पक्ष समोर असतील या सर्व विषयांवर २० ऑगस्ट ते २७ ऑगस्टपर्यंत चर्चा होणार. यातून जी माहिती मिळेल त्यावर २९ ऑगस्टला निर्णय घेणार, अशी माहिती जरांगे यांनी दिली.
तसेच या प्रक्रियेदरम्यान कोणाकोणाला आपला समाज मोठा करावासा वाटतो, आपल्या जातीतल्या गोरगरिबाला न्याय मिळावा कोणा कोणाला वाटतं, आपल्या गोरगरिबाच्या हातात सत्ता यावी किंवा त्यांनी सत्ता देणारे बनाव हे कोणाकोणाला वाटतं हे लक्षात येऊन जाईल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.