- बापू सोळुंके
औरंगाबाद : कोरोना आणि न्यायालयाकडून जामीन घेऊन शहर आणि औरंगाबाद ग्रामीण भागातील तब्बल २९० गुन्हेगार जेलमधून बाहेर आले आहेत. जेलमधून सुटताच गुन्हेगार सक्रिय झाल्याने लॉकडाऊन शिथिल होताच शहरातील वाहनचोऱ्या, घरफोड्या आणि अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.
शहरातून दररोज सात ते आठ मोटारसायकल चोरीला जात आहेत. वाहन चोरीसोबत घरफोडी आणि उघड्या घरातून किमती माल पळविणे, मारहाण करून लुटणे, मंगळसूत्र चोरी, मोबाईल चोरी, तोतयागिरी करून फसवणूक करणे, आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे सतत घडत आहेत. यासोबत खून, खुनाचा प्रयत्न, किरकोळ कारणावरून शस्त्राने मारहाण करणे आदी गंभीर स्वरूपाच्या घटना वाढल्या आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या खून आणि खुनाचा प्रयत्न, बलात्कारसारख्या गुन्ह्यातील जेलमधील आरोपींना कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने पॅरोलवर सोडले होते, तर नव्याने पकडल्या जाणाऱ्या आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळत असल्यामुळे शहरातील २००, तर ग्रामीणमधील ९०, असे एकूण २९० गुन्हेगार सध्या जामीन घेऊन जेलबाहेर आले आहेत. अनेक गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले. गुन्हे रोखण्यासाठी आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात गस्त वाढविली आहे. कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येत आहे.