औरंगाबाद : मंगळवारी (दि. ६ सप्टेंबर) रात्रीच्या पावसाने शहराची विदारक अवस्था केली होती. अनेक वसाहतींमधील पाणी ओसरलेले नाही. त्यामुळे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांनी शुक्रवारी सकाळी काही वसाहतींची पाहणी केली. आरेफ कॉलनी आणि जलाल कॉलनीला जोडणाऱ्या पुलासाठी अंदाजपत्रक तयार करा, दोन कोटींपर्यंतचा निधी मिळवून देण्यात येईल. श्रेयनगर येथील पुलासाठी १ कोटी १० लाखांचा निधी मिळवून देण्याची घोषणा त्यांनी केली.
मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. झालेल्या नुकसानाची पाहणी अब्दुल सत्तार यांनी केली. त्यांनी श्रेयनगर, नूर कॉलनी, जलाल कॉलनी भागांची पाहणी केली. यावेळी आ. अंबादास दानवे यांची उपस्थिती होती. खाम नदी पात्राच्या आसपास अनेक वसाहती तयार झाल्या आहेत. आरेफ कॉलनी आणि जलाल कॉलनीला जोडणारा एक छोटासा पूल काही खासगी व्यक्तींनी उभारला आहे. दरवर्षी पात्रात पाणी वाढले तर जलाल, हिलाल कॉलनीतील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. छोट्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना ये-जा करता येत नाही. पुलाची उंची वाढविणे, रुंदी वाढविणे, नदी पात्राचे खोलीकरण करण्यासाठी त्वरित अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश सत्तार यांनी दिले. मनपा अधिकाऱ्यांनी दोन ते अडीच कोटींचे अंदाजपत्रक होईल, असे सांगितले. निधी कितीही लागु द्या, तुम्ही चिंता नका करू, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी नमूद केले. टाऊन हॉलजवळील नुर कॉलनीचीही पाहणी त्यांनी केली.
श्रेयनगरसाठी १ कोटी १० लाखश्रेयनगर भागातील शलाका अपार्टमेंटलगत नाल्याचे पाणी मंगळवारी अनेक घरात शिरले होते. या भागाची देखील पाहणी त्यांनी केली. याठिकाणी अस्तित्वात असलेला जुना पूल पाडून उंची वाढवून पाइप ऐवजी स्लॅब टाकून नवीन पूल बांधण्यासाठी, नाल्याची संरक्षण भिंत बांधण्यासाठी आणि नाल्याची खोली वाढविण्यासाठी १ कोटी १० लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी माजी नगरसेवक रेणूकदास वैद्य, माजी नगरसेविका शिल्पा वाडकर, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, रवींद्र निकम, वॉर्ड अधिकारी एस. आर. जरारे, वॉर्ड अभियंता बी. के. परदेशी यांची उपस्थिती होती.