लोकमत न्यूज नेटवर्ककरमाड : औरंगाबाद-जालना मार्गावर गोलटगाव फाट्याजवळील हॉटेल अजिंक्यजवळ ट्रक दुभाजकावर आदळून पलटी झाल्याने दोन जण जागीच ठार झाले, तर १२ जण जखमी झाले. या अपघातात चालक पुरुषोत्तम किसन वायाळ (४०) व प्रकाश शंकर भुतेकर (३५, रा. दोघेही खोळेगाव, ता. लोणार (जिल्हा बुलढाणा) हे दोघे गाडीखाली दबून जागीच ठार झाले. शेकटा शिवारात झालेल्या अन्य एका अपघातात रस्त्यावर उभ्या ट्रॅव्हल्स बसवर ट्रक आदळल्याने एक जण जागीच ठार झाला.सध्या महाराष्ट्रात एसटी कर्मचा-यांचा संप चालू असल्याने प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे. चाकण पुणे येथून जवळपास १५ कामगार दिवाळीसाठी ( एम एच २० बी. टी.१११३) या ट्रकमधून खोळेगाव (ता. लोणार जि. बुलढाणा) येथे जात असताना औरंगाबाद-जालना मार्गावरील गोलटगाव फाट्याजवळ एका मोटारसायकलस्वारास वाचवताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळून पलटी झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर इतर बारा प्रवासी जखमी झाले. भगवान दिगंबर वायाळ (३५), अरुण बद्रीनाथ सानप (४३) रा. खोळेगाव ता. लोणार जि. बुलढाणा यांच्यासह इतर १० जखमींची नावे कळाली नाही. अपघात होताच स्थानिकांनी करमाड पोलीस ठाण्यात माहिती दिली. यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना औरंगाबाद येथील घाटीत दाखल करून क्रेनच्या साह्याने आयशर ट्रक रस्त्याच्या बाजूला केला.अपघात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोरख शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे, जमादार रवींद्र साळवे, नामदेव धोंडकर करीत आहे.
शेकट्याजवळ दोन अपघातांत ३ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:43 AM