औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आजवर महापालिकेने शहरात ३ लाख ३७ हजार ८८० नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या. त्यातील ३१ हजार ५४ नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर २ लाख ७७ हजार ३८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचा दावा मनपाने केला आहे.
१८ मार्च २०२० पासून शहरात कोरोना संसर्गाची लागण होण्यास सुरुवात झाली.संसर्गाने संपूर्ण शहराला विळखा घातला. दिवसाकाठी ५०० ते ८०० रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुन्हा चाचण्यांवर भर दिला आहे. दिवाळीनंतर शहरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.दिल्लीत आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशन, विमानतळावर प्रवाशांची कोरोना चाचणी मनपाने सुरू केली.
शहरातील कोरोना चाचणी केंद्र आणि मोबाईल टीमच्या माध्यमातून कोरोना चाचण्या होत आहेत. चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. शहरात घाटी, जिल्हा सामान्य रुग्ण, चिकलठाणा कोविड सेंटरसह पालिकेचे कोविड सेंटर्स आणि खासगी रुग्णालयांत सध्या एकूण ६७४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ६५० रुग्ण हे शहरातील आहेत. तर ११ रुग्ण हे ग्रामीण भागातील असून १३ रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. घाटी, एमजीएम आणि मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये जास्तीचे रुग्ण दाखल आहेत.