औरंगाबाद : शहरातील ३ पोलीस अधिकारी आणि २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाची लाट आल्यापासून आजपर्यंत ३४ अधिकारी आणि २९२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर चार पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सध्या दर शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन आणि रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासोबतच शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटला केवळ पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांसोबतच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत आहेत. कोरोना संसर्ग आटोक्यात यावा, याकरिता जिवाचे रान करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे.
क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी आणि एक कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यामुळे ते सध्या रजेवर आहेत. यासोबतच शहरातील अन्य विविध ठाण्यांतील कर्मचारीही बाधित होत आहेत. गतवर्षीपासून आजपर्यंत ३४ पोलीस अधिकारी आणि २९२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. सध्या ३ अधिकारी आणि २१ कर्मचारी उपचार घेत आहेत तर ३० अधिकारी आणि २५४ पोलिसांनी कोरोनावर मात करताना क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून ५५ आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या पोलिसांना गर्दीच्या ठिकाणी काम दिले जात नाही. शक्यतो त्यांना पोलीस ठाण्यात बसून अथवा गस्ती पथकासोबत ठेवले जाते.
आजपर्यंत शहरातील चार पोलिसांचा मृत्यूकोरोना संसर्गाने आजपर्यंत शहर पोलीस दलातील चार पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी दिली.