जालना : ट्रक चालकाला विनाकारण बेदम मारहाण करणाऱ्या तीन पोलिसांना पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी निलंबित केले. ९ जून रोजी या तिघांनी जामखेड शिवारात ट्रक अडवून आशपाक शेख यांना मारहाण केली होती. ही कारवाई १६ जून रोजी करण्यात आली. अंबड तालुक्यातील जामखेड येथे ९ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या लगत एक ट्रक (एम.एच.२३/६७७४) अंधारात उभा होता. यादरम्यान अंबड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक एम.एच. चेपटे, पोलीस नाईक एस.जी. देवडे, पोलीस शिपाई आर.वाय. वैराळे हे शासकीय कामानिमित्ताने या मार्गाने जात होते. ट्रक पाहून ते जामखेड येथे थांबले. त्यांनी ट्रक चालक आशपाक शेख उमरगुल (बीड) यांना बोलावून घेतले. त्यांला काही एक न विचारता अपशब्द वापरून बेदम मारहाण केली. त्याठिकाणी जामखेडचे उपसरपंचाचे पती जमीर हाजी शेख आले. त्यांनी सदर चालक आपला नातेवाईक असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतर सदर कर्मचारी तेथून निघून गेले. याप्रकरणी अशफाक यांनी पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांच्याकडे तक्रार केली. उपविभागीय पोलीस अधिकारी व्रिकांत देशमुख यांनी चौकशी करून अहवाल सिंह यांना सदर केला. त्यात सदर तिघांनी कर्मचाऱ्यांची वागणूक ही पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी असल्याचे सकृतदर्शनी आढळून आले होते. (प्रतिनिधी)
३ पोलीस निलंबित
By admin | Published: June 17, 2014 12:12 AM