औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच नागरिकांचीही लस घेण्यासाठी गर्दी होते आहे. केंद्र शासनाने दि. १ एप्रिलपासून ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून शहरात सुरू झाली. पहिल्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभरात ३ हजार २९७ नागरिकांना लस देण्यात आली. ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या १६२४ नागरिकांनी लस घेतली.
शहरात आतापर्यंत एक लाखापेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली. महापालिकेकडे बुधवारी सायंकाळपर्यंत लसीचा साठा नव्हता. गुरुवारी सकाळी महापालिकेला लसीचे ६० हजार डोस प्राप्त झाले. शहरातील ४६ लसीकरण केंद्रांवर त्वरित लस पाठविण्यात आली. उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन आरोग्य विभागाने मंडपाची व्यवस्था केली होती. सोशल डिस्टन्स राखत नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. प्रत्येक केंद्रावर रोजच्यापेक्षा दुप्पट गर्दी दिसून येत होती. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ३ हजार २९७ नागरिकांना लस देण्यात आली. त्यामध्ये ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांची संख्या १६२४ आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने संपूर्ण नियोजन करून ठेवले आहे.