औरंगाबाद : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील १८२ मंडळांत आजवरच्या पावसाने दाणादाण उडवून दिली असून ३ हजार ६४० गावांतील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यात जमा आहे. विभागात प्राथमिक अहवालानुसार सुमारे पावणेचार लाख हेक्टरवर पेरण्यानंतर बुड धरलेल्या पिकांचा चिखल झाला आहे. सव्वा लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे आजवर झाले आहेत. अडीच लाख हेक्टरवरील पंचनामे अद्याप होणे बाकी आहे. ३२ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.
६ लाख २१ हजार शेतकऱ्यांचे आजवर झालेल्या पावसाने नुकसान केले आहे. मराठवाड्यात (८ ते २५ जुलै) जोरदार पावसाचा ३६४० गावांतील पिकांना फटका बसला आहे. विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, जालना २५५ हेक्टर, परभणी १२०० हेक्टर, हिंगोली ७६ हजार ७७१, नांदेड २ लाख ९८ हजार ८६१, तर लातूर जिल्ह्यातील १६४०, तर बीडमधील २६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
विभागात आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४४५ मि.मी. पाऊस झाला आहे. २८४ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. १६१ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. ६६ टक्के पावसाचे प्रमाण असून, उर्वरित ६६ दिवसांच्या पावसाळ्यात ३४ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला, तर विभागातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
नांदेडमध्ये ४०० कोटींचे नुकसाननांदेड जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ३३ हजार ४८४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २ लाख ९८ हजार ८६१ हेक्टरवरील पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. फळपीक, बागायत क्षेत्र, जिरायत क्षेत्रावरील नुकसानीचा यात समावेश आहे. रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय मालमत्ता, इमारतींसह ४०० कोटींपेक्षा अधिक नुकसानीचा अंदाज आहे.
सर्व प्रकल्पांत ७७ टक्के पाणीविभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ७७.७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यात जायकवाडी ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. निम्न दुधना ६९, येलदरी ६४, सिद्धेश्वर ५४, माजलगाव ४०, मांजरा ३५, पैनगंगा ८६, मानार १०० टक्के, तर निम्न तेरणा ६३, विष्णुपरी ७७, तर सिनाकोळेगाव प्रकल्पात सध्या १९ टक्के जलसाठा आहे.