पैठण : शहरात महेश सेवा संघ व माहेश्वरी जनकल्याण संस्थानतर्फे ३० खाटा असलेले गृह विलगीकरण सेंटर सुरू करण्यात आले आहे. या गृह विलगीकरण कक्षात ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथकातील डॉक्टर नियमित सेवा पुरविणार आहेत. विलगीकरणाची सोय नसलेल्या रूग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महेश सेवा संघाचे नंदलाल लाहोटी यांनी केले आहे.
पैठण शहर व तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असून तिसरी लाट लक्षात घेता प्रशासकीय स्तरावर तयारी सुरू आहे. स्वयंसेवी संस्थांनी शहरात गृहविलगीकरण कक्ष सुरू करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर महेश सेवा संघ व माहेश्वरी जनकल्याण संस्थान पैठणने शहरातील माहेश्वरी भक्त निवासात गृहविलगीकरण कक्ष सुरू केले. सोमवारी पोलीस निरीक्षक किशोर पवार, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथकाचे प्रपाठक डॉ. भारत चव्हाण यांच्या हस्ते या कक्षाचे उदघाटन झाले. यावेळी नंदलाल लाहोटी, विजय पापडीवाल, जुगल लोहिया, शाम लोहिया, नरसिंग लोहिया, सुजय मोदानी, गणेश लोहिया, बालाप्रसाद साबू, पवन लोहिया, श्रीराम काकडे आदी उपस्थित होते.
या विलगीकरण कक्षात प्रवेशासाठी वैद्यकीय शिफारस व ओळखपत्र आवश्यक राहणार आहे. विलगीकरण कक्षात रुग्णांना चहा, नाश्ता आणि भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विलगीकरण कक्षासाठी माहेश्वरी जनकल्याण संस्थानचे अध्यक्ष विक्रम सारडा, कार्याध्यक्ष पुरूषोत्तम लोहिया, सह कार्यकारी विश्वस्त दिलीप सोनी यांनी माहेश्वरी भक्त निवास उपलब्ध करून दिले.
----- वैद्यकीय सेवा पुरविणार -------
माहेश्वरी भक्त निवासात सुरू झालेल्या विलगीकरण कक्षात नियमितपणे रूग्णांची आरोग्य तपासणी डॉक्टर करणार असून सर्व वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार असल्याचे शासकीय रूग्णालयाचे प्रपाठक डॉ. भारत चव्हाण यांनी स्पष्ट केले.
--- विलगीकरण कक्षाची मर्यादा वाढविणार ---
सध्या ३० खाटांचा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. परिस्थितीचा विचार करून गरजेनुसार अजून बेड वाढविण्याचे नियोजन असल्याचे महेश सेवा संघाचे नंदलाल लाहोटी व सदस्यांनी सांगितले.
---- फोटो
190521\img_20210519_154210.jpg
पैठण शहरात ३० खाटांचा विलगीकरण कक्ष