औरंगाबाद : निवडणुकीच्या धामधुमीत थांबलेली ग्राहकी मागील तीन दिवसांपासून बाजारात मोठ्या संख्येने पाहावयास मिळाली. रेडिमेड कपडे खरेदीवर ग्राहकांच्या उड्या पडल्या. परिणामी, पैठणगेटपासून ते सराफा रोडपर्यंतचा रस्ता ग्राहकांनी खुलला होता. जिकडे पाहावे तिकडे ग्राहकच ग्राहक दिसत होते. खरेदीत्सोवात धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारपेठेत ३० कोटींची उलाढाल झाली. गुरुवारी २३ रोजी घरोघरी लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. दिवाळीतील या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी नवीन कपडे घालून नागरिक लक्ष्मीची पूजा करणार आहेत व त्यानंतर फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करणार आहेत. यानिमित्ताने कपड्यांपासून पूजेच्या साहित्यापर्यंतची खरेदी करण्यासाठी रविवारपासून बाजारपेठेत गर्दी होत आहे. काहींनी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून आज खरेदीचा बार उडविला. लहानापासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांसाठी खरेदी केली जात होती. दुपारी १२ वाजेनंतर बाजारात मोठी गर्दी झाली. वाहतूक जाम होत असल्याने पैठणगेट येथे पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. यामुळे अनेक वाहनधारकांना आपली कार पैठणगेट परिसरातील पार्किंगमध्ये थांबवून पुढे खरेदीसाठी बाजारपेठेत पायी फिरावे लागले. पैठणगेट ते टिळक पथपर्यंतच्या रस्त्यावर तसेच सुपारी हनुमान रोड ते सिटीचौक, कुंभारवाडा या परिसरात पायी चालणे कठीण झाले होते. जुन्या बाजारपेठेतील गर्दीमुळे सिडको- हडको, जवाहर कॉलनी, शिवाजीनगर इ. परिसरातील नागरिकांनी जालना रोड, त्रिमूर्ती चौक, कॅनॉट प्लेस, आविष्कार कॉलनी रोड, टीव्ही सेंटर चौकातील दुकानांमध्ये विविध सामान खरेदी करणे पसंत केले. दिवसभर रेडिमेड कपडे खरेदीला मोठी गर्दी होती. दुकानांमध्ये पाऊल ठेवणे कठीण झाले होते. विविध कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना यंदा चांगला बोनस मिळाला आहे. त्यामुळे बाजारात चांगला उत्साह दिसून आला.दुकानातील कर्मचाऱ्यांना चहा पिण्यासाठीही फुरसत मिळाली नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले की, रविवारपेक्षा सोमवार व मंगळवारी बाजारात मोठी गर्दी होती. आज दिवसभरात ३० कोटींची उलाढाल झाली असून, येत्या दोन दिवसांत बाजारात उलाढालीचा विक्रम नोंदविला जाईल.
दिवसभरात ३० कोटींची उलाढाल
By admin | Published: October 22, 2014 12:42 AM