कारवाई करणार : लेटलतिफांना चाप लावण्यासाठी मोहीम
औरंगाबाद : जिल्हा परिषदेत सलग तिसऱ्या दिवशी कर्मचारी हजेरी रजिस्टरची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून पडताळणी, विभागप्रमुखांची कानउघाडणी केल्यामुळे लेटलतिफांच्या संख्येत तिसऱ्या दिवशी घट दिसून आली. शुक्रवारी सकाळी केलेल्या तपासणीत ३० कर्मचारी गैरहजर आढळून आले.
कर्मचाऱ्यांनी वेळेवर कार्यालयात यावे, कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहावे व लेटलतिफांना चाप बसविण्यासाठी जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांची मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी बुधवारी सकाळी झाडाझडती घेतली. त्यात १२९ लेटलतिफ गैरहजर आढळून आले. त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी स्वीय सहायकांना दररोज हजेरी रजिस्टर मागवून पडताळणीच्या सूचना दिल्या. त्यानुसार केलेल्या तपासणीत गुरुवारी ६१ जण गैरहजर आढळून आले, तर नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी ३० लेटलतीफ कर्मचारी गैरहजर होते. या कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून नोटिसा बजावण्यात येणार आहेत. यापुढेही कार्यवाही सुरू राहणार असून, अचानक भेटीही होतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले.