औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे जे अधिकारी, कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत. त्यांची चौकशीअंती पगारातून ३० टक्के पगार कपात करुन आई-वडिलांच्या खात्यात वळती करण्याचा ठराव सभागृहात एकमुखाने पारीत झाला.
जिल्हा परिषदेत कार्यरत काही अधिकारी, कर्मचारी आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत. त्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. अशा तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष मिना शेळके यांनी सर्वसाधारण सभेतच यासंबंंधी ठराव मांडला. एरव्ही फारशा न बोलणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष मिना शेळके यांनी आई-वडिलांना सांभाळण्याचा मुद्दा पोटतिकडीने मांडला. या भावनिक मुद्दयांवर योग्य तोडगा काढत जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी आई- वडिलांचा सन्मानाने सांभाळ करण्याची विनंती केली. त्यावर सर्व सभागृहाने टाळ्यावाजवत त्यांच्या ठरावाला अनुमोद दिले.
यापुढे अशा तक्रारी आल्यास त्याची चौकशी करुन दोषी अधिकारी कर्मचारी यांच्या पगारातून ३० टक्के पगार कपात करावी आणि ती रक्कम संबंधीत आई वडिलांच्या खात्यात जमा करावी असा ठराव त्यांनी सर्व साधारण सभेत मांडला. जिल्हा परिषदेच्या बाहेर चौथ्यांदा सर्वसाधारण सभा घेण्यात आली. तर दुसऱ्यांदा ही सभा महसुल प्रबोधिनीच्या सभागृहात झाली. त्यात हा ठराव या सभेची आठवण ठेवणारा असल्याची भावना सभासदांनी व्यक्त केली.