बीड : एकीकडे जिल्हा रुग्णालयात वाढीव खाटांना मंजुरी मिळाली आहे, तर दुसरीकडे एक फिजीशियन ३१० खाटांचे जिल्हा रुग्णालय सांभाळत आहे. अशी दयनीय अवस्था येथील जिल्हा रुग्णालयाची झाली आहे. शनिवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली असता फिजीशियनच हजर नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र समोर आले.जिल्हा रुग्णालयात एक महिन्यापूर्वी तीन फिजीशियन होते. यातील एक फिजीशियन मागील महिनाभरापूर्वी सोडून गेले, तर दुसरा फिजीशियन १५ दिवसांपासून रजेवर आहे. तिसरे फिजीशियन डॉ. धूत यांच्यावर ३१० खाटांच्या रुग्णालयाची मदार आहे. रुग्ण अनेक असल्याने एक डॉक्टर उपचार कसे करणार ? असा प्रश्न काही डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. मनुष्यबळाचा अभाव असल्याने जिल्हा रुग्णायालयातील आरोग्य सेवा पुरती कोलमडली आहे.शनिवारी रात्री जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. या दरम्यान एकही डॉक्टर (फिजीशियन) हजर नसल्याने दाखल रुग्णाच्या उपचाराची प्रक्रिया खोळंबली असल्याचे तेथील रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. हा प्रकार जिल्हा रुग्णालयात नवीन नाही. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना उपचारासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागते.पाऊस पडून गेल्यामुळे सध्या साथीच्या आजाराची मोठी शक्यता आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला, ताप येणे याचे रुग्ण वाढले आहेत. अशा परिस्थितीत फिजीशियन यांच्याकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, रुग्णांना सेवा मिळत नसल्याने ‘असून खोळंबा नसून अडचण’ अशी परिस्थिती येथील जिल्हा रुग्णालयात झाली आहे. (प्रतिनिधी)
३०० खाटांचा भार एका डॉक्टरवर !
By admin | Published: October 10, 2016 12:01 AM