श्यामकुमार पुरेअजिंठा : अजिंठा येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर दुसºयाच्या नावावर ३०० रुपये रोजाने परीक्षा देणाºया ७ तोतया परीक्षार्थींसह १५ जणांवर अजिंठा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. शहरात नोकरी करणाºयांकडून २५ ते ५० हजार रुपये घेऊन त्यांना अशा तोतया परीक्षार्थींच्या मदतीने पास करून देण्याची हमी देणारा ‘किंगमेकर’ जामनेर तालुक्यातील एका शाळेचा शिक्षक असल्याचे समोर आले आहे. यामुळे सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली आहे.अजिंठा येथील नेहरू मेमोरिअल उर्दू शाळेत बारावी परीक्षेच्या हॉल तिकीटमध्ये बदल करून ज्यांनी परीक्षा दिली ते विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांनी जामनेर तालुक्यातील विविध महाविद्यालयांत अॅडमिशन घेतले असून, येथे तुम्हाला पास करून देतो, त्या बदल्यात तुम्ही दुसºया विद्यार्थ्याच्या नावावर परीक्षा द्या, त्या बदल्यात एक पेपर सोडविण्यासाठी ३०० रुपये विद्यार्थ्यांना या ‘किंगमेकर’कडून दिले जात होते.सदर सात विद्यार्थ्यांचे अॅडमिशन सिल्लोड तालुक्यातील हळदा येथील नूतन कला, विज्ञान वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयात झाले आहे; पण हे कॉलेज हळद्यात कागदोपत्री चालणारे आहे. केवळ भाड्याच्या बिल्डिंगमध्ये आॅफिस थाटून ही शाळा चालविली जाते, असे गावकºयांचे म्हणणे आहे. गावात विद्यार्थी न मिळाल्याने हे कॉलेज नावापुरते सुरू होते. कॉलेज दाखविणे व मान्यता टिकवण्यासाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश दिला जात होता. त्यासाठी जामनेर तालुक्यातील मेठे नावाच्या शिक्षकाने नोकरीवर असलेले ठाणे, मुंबई, नाशिक येथील विद्यार्थ्यांना घेरून येथे प्रवेश दिला. या बदल्यात २५ ते ५० हजार रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आले. परीक्षा आली की, हॉल तिकिटावर दुसºया मुलांचे फोटो लावून परीक्षा द्यायला लावायची, असे हे ‘नेटवर्क’ होते; परंतु दुर्दैवाने काल त्यांचे बिंग फुटले.कोट...परीक्षार्थी म्हणतात...उंडणगाव येथील ज्योती सांडू हिवाळे हिने ठाणे येथील सोनाली तरे हिच्या नावावर परीक्षा दिली. याबाबत ज्योतीने सांगितले की, जामनेर तालुक्यातील डी.एम. मेठे या शिक्षकाने आम्हाला ३०० रुपये पेपरप्रमाणे पैसे दिले. यापूर्वीचे दोन पेपर आम्हीच हॉल तिकिटावर आमचे फोटो लावून दिले. फोटोतील बदल आम्हाला मेठे यांनी करून दिला. सर्व विद्यार्थ्यांना त्यांनीच लालूच दिली. शिवाय आम्हाला तो बी.ए.च्या परीक्षेत उत्तीर्ण पण करून देणार आहे.मेठे याने प्रवेश करून दिलेल्या व नेहरू मेमोरिअल उर्दू शाळेत परीक्षा देत असलेले विद्यार्थी भीमराव शामराव सुरवाडे, अखिलेश मनोहर सुरवाडे (दोघेही रा. सामरोद, ता. जामनेर, हल्ली मुक्काम मुंबई) हे मुंबईत एका नामांकित कंपनीत नोकरी करतात. त्यांनी सांगितले की, मेठे यांना आम्ही प्रवेशासाठी १५ हजार रुपये दिले आहेत; पण आमच्या हॉल तिकिटावर आम्हीच परीक्षा देतोय.संस्थाचालक म्हणतात...‘आमचा संबंध नाही’आमचे नूतन विद्यालय हळदा येथे भाड्याच्या खोलीत सुरू होते. तेथे एकूण १९ विद्यार्थ्यांनी अॅडमिशन घेतले आहे. हळद्यातील कॉलेज आम्ही स्थलांतरित करीत आहोत. कॉलेज कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्षात सुरू आहे. मेठे या शिक्षकाने त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला होता; पण हॉल तिकीटमध्ये बदल करून गैरप्रकार झाल्याच्या प्रकरणाशी आमचा काही संबंध नाही, यात शाळेचा दोष नाही, असे संस्थाध्यक्ष ए.एस. शिरसाठ यांनी सांगितले.‘महात्मा फुले’तूनही पळाले २ तोतया विद्यार्थीअजिंठा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या नावावर परीक्षा देण्यासाठी आलेले तोतया विद्यार्थी राहुल राजेंद्र भालेराव औरंगाबाद, अन्सार शेरखा तडवी (रा. देवळगाव गुजरी) यांना केंद्रप्रमुख गायकवाड यांनी उशिरा आल्याने गेटवर अडविले. हॉल तिकीट चेक केले असता त्यात अफरातफर दिसून आली. यामुळे त्यांनी त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊ दिली नाही. याबाबतीत अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पकडण्यापूर्वीच ते दोघे पळून गेले.अटक केलेल्या ६ आरोपींना सिल्लोड न्यायालयाने जामिनीवर सोडले असल्याची माहिती फोजदार अर्जुन चौधर यांनी दिली.पर्दाफाश करणारआरोपींना पीसीआर मिळाला असता, तर तपासात मदत झाली असती. आम्ही योग्य दिशेने तपास करीत आहोत. या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारासह दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. कुणाचीही गय करणार नाही, या रॅकेटचा पर्दाफाश करू, अशी माहिती अजिंठ्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर व फौजदार अर्जुन चौधर यांनी दिली. हळदा येथील नूतन शाळा अस्तित्वात नाही, असे हळद्याचे उपसरपंच सोनूसिंग शिमरे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी नूतन विद्यालयाचे बसस्टॅण्डवर आॅफिस होते. मुले मिळाले नसल्याने शाळा सुरू झाली नाही. बहुतेक ही शाळा कागदोपत्री असावी, अशी माहिती पंचायत समिती सदस्य किशोर गवळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष केशव गवळे यांनी दिली. ज्या खोलीवर शाळेचे बोर्ड लावण्यात आले होते त्या जागेचे मालक संजय शिमरे यांनी सांगितले की, माझ्याकडे लग्न असल्याने मी बोर्ड काढला आहे.
तोतया विद्यार्थ्यांना प्रतिपेपर ३०० रुपयांचे मान‘धन!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:58 AM