औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबादकरांच्या जिव्हाळ्याचे काही प्रश्न शासन दरबारी पडून आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या विषयांबाबत ते घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनतेच्या प्रश्नासोबत या दौऱ्यात अनेक दिग्गजांची मांदीयाळी असणार आहे. त्यामुळे, येथील सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यत आहे. त्यासाठी, शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार आपल्या कार्यकर्त्यांची फौज पाठवत आहेत. मात्र, यादरम्यान एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन माणसं आणल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे, शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्याच्या पारड्यात झुकतं माप देण्यात आलं आहे. पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद देण्यात आलं. तर, तानाजी सावंत हेही कॅबिनेटमंत्री झाले. त्यामुळे, मंत्री संदीपान भुमरे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पैठण येथे आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सभेला मोठ्या गर्दीची अपेक्षा आहे. त्याच पाश्वभूमीवर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सामना रंगला आहे.
कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यकर्त्यांची एक Audio Clip Viral झाली आहे. या Audio Clip मध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अडीचशे ते 300 रुपये देऊन महिलांना सभेसाठी आणण्यात आले, असे देखील संभाषण क्लीपमध्ये आहे. ही ऑडिओ क्लीप कधीची आहे? आताची आहे की जुनी आहे? याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र, शिंदे गटाकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत.
जिल्हाप्रमुख जंजाळांची सायबर सेलकडे तक्रार
आज पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच एक ऑडिओ क्लिप व्हयरल झाली आहे. सभेला गर्दी जमावी यासाठी पैसे वाटल्याचं संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. या ऑडिओ क्लिपबाबत शिंदे गटाकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ही ऑडिओ क्लिप बनावट आहे. कोणी तरी मुद्दाम बनवून ही क्लिप व्हायरल केल्याचं शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.