औरंगाबाद : शहरातील वाहतूक नियमन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी तब्बल ५३ चौकांत वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत. या सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेली महापालिका या सिग्नलविषयी काहीही देणे घेणे नाही, असा व्यवहार करीत असते. परिणामी शहरातील तब्बल ३१ सिग्नल बंद पडले आहेत तर सुरू असलेल्या २२ सिग्नलचे टाईमर बंद पडल्याचे समोर आले.
शहरातील वाहतूक नियमन करण्यासाठी पोलीस विभागाची स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यरत आहे. वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने शहरातील तब्बल ५३ चौकांत वाहतूक सिग्नल बसविले आहेत. शहरात नुकतेच रुजू झालेले वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला तेव्हा ५३ पैकी केवळ २२ सिग्नल सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या सिग्नलचेही टाईमर नादुरुस्त असल्याचे त्यांना दिसले. या सिग्नलची दुरुस्ती तातडीने करावी याकरिता त्यांनी मनपा शहर अभियंता कोल्हे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील चौकातील वाहतूक समस्येची पाहणी केली.
जालना रोडवरील वाहतूक विना अडथळा सुरळीत सुरू राहावी याकरिता शासकीय दूध डेअरी चौकाप्रमाणे आकाशवाणी चौकातील वाहतूक सिग्नल सायंकाळी ६ ते ८ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची २१ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी होत आहे. शहरातील वाहतूक नियमन करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होताना दिसते. सिग्नल बंद असल्यामुळे पोलिसांना हाताने आणि शिटी वाजवून वाहतूक नियमन करावे लागते. परंतु सिग्नल जर व्यवस्थित सुरू असेल तर वाहतूक पोलिसाला दिलासा मिळतो आणि सिग्नल तोडून पळणाऱ्यांची संख्याही कमी होते. शिवाय नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे पोलिसांना शक्य होते.
सर्व सिग्नल सुरु ठेवणे आवश्यक शहरातील रस्ते जैसे थे आहेत. वाहने मात्र प्रचंड वाढली आहेत. यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्व वाहतूक सिग्नल सुरू ठेवणे आवश्यक आहे. - सुरेश वानखेडे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक.