औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. २१ फेब्रुवारी रोजी इंग्रजीचा पहिला पेपर झाला. यंदा कधी नव्हे, तेवढ्या कडक बंदोबस्तात परीक्षेला सुरुवात झाली खरी. मात्र, पहिल्याच दिवशी औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांत कॉपीमुक्त अभियानाला सुरुंग लागला. जिल्ह्यात ३ ठिकाणी, तर विभागात एकूण ३२ कॉपींचे प्रकार घडले. केंद्रांवर तैनात यंत्रणांनी वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला. तथापि, उर्वरित ठिकाणी आजची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.
मंगळवारी सकाळी ११ वाजता इंग्रजीच्या पेपरला सुरुवात झाली. परीक्षा केंद्रावर येताना सकाळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर भीती जाणवत होती, परंतु पेपर झाल्यानंतर आनंदी चेहऱ्याने विद्यार्थी बाहेर पडताना दिसत होते. परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांची कसून झडती घेण्यात आली. विद्यार्थ्यांकडील सर्व प्रकारचे साहित्य यात बॅग, पाण्याची बाटली, मोबाइल, बूट, खिशातील पैसे परीक्षा कक्षाच्या बाहेर ठेवण्यात आले. परीक्षा कक्षात एका बाकावर एकाच विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रावर बैठे बैठक, ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे, पोलिस, महसूल, शिक्षण विभागाचे अधिकारी तैनात होते. शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा तांडा येथील परीक्षा केंद्रा ठाण मांडले, तर शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्या नेतृत्वाखालील सातव यांच्या पथकाने कन्नड तालुक्यातील निपाणी येथील संवेदनशील केंद्राला भेट दिली.
कॉपीच्या घटना कुठे, किती?इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये जालना जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी स्वत: शिवली येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याची कॉपी पकडली. त्यानंतर, तेथील पथके सक्रिय झाली. या पथकांनी १७ कॉपीची प्रकरणे उघडकीस आणली. हिंगोली जिल्ह्यात १२ प्रकरणे, औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या पथकांनी पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील केंद्रांवर २ आणि गंगापूरमध्ये एका केंद्रावर कॉपी पकडली.