जायकवाडी : जायकवाडी प्रकल्पाचा नाथसागर राष्ट्राला अर्पण करून ४० वर्षे लोटली आहेत. या काळात नाथसागर ११ वेळेस तुडुंब भरला. त्यामुळे वेळोवेळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती वाहून आली आणि त्याचे रूपांतर गाळात झाले. पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाथसागरात सद्य:स्थितीत मृतसाठ्यात ३२ टक्के गाळ असल्याचे सांगितले. नाथसागरातील गाळ वेळोवेळी काढला गेला नाही. त्यामुळे वेळोवेळी नाथसागरातून पाणी गोदावरी पात्रात सोडावे लागले. असे असले तरी गाळाची वस्तुस्थिती समोर येण्यासाठी त्यांचे सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. सध्या मृत साठ्यातून पिण्यासाठी पाणी वापरले जात असून, आजचे बाष्पीभवन 0.८५७ दलघमी आहे. त्यामुळे जलसाठा झपाट्याने कमी होतो आहे. या प्रकल्पातून सध्या सिंचनासाठी पाणी दिले जात नाही. औद्योगिक वापर व पिण्यासाठी पाणी तेवढे दिले जाते. उपलब्ध पाण्याची टक्केवारी ४० वर्षांपूर्वीच्या जलधारण क्षमतेवर आधारलेली असल्याने ती फसवी आहे. त्यामुळे अचानक हे पाणी कमी होऊन गाळ उघडा पडल्यास नवल नाही. आजच्या स्थितीत नाथसागरात किती गाळ आहे, किती काढणे आवश्यक आहे, याचा अभ्यास जलसंपदा विभागाने करून गाळ काढण्याची उपाययोजना तात्काळ करणे आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षांपासून पडत असलेल्या भयानक दुष्काळामुळे पाणी प्रश्न गंभीर बनत चालला असून, या धरणातील गाळ काढून पाण्याची साठवणूक क्षमता वाढवणे हाच एकमेव पर्याय आता राहिला आहे. यात दिरंगाई होणार नाही याची विशेष दक्षता विभागीय आयुक्तांनी घेणे ही काळाची गरज होऊन बसली आहे. गाळ काढला नाही तर मराठवाड्यावर मोठे जल संकट कोसळेल आणि वेळेवर काही केले नाही म्हणून बोंबा मारल्याशिवाय हाती काही लागणार नाही, अशी अवस्था भविष्यात पाहायला मिळेल.
जायकवाडी प्रकल्पात ३२% गाळ
By admin | Published: May 24, 2016 12:53 AM