लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील कोरोना तपासण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. शनिवारी शहरात १०० नागरिकांच्या केलेल्या तपासणीत तब्बल ३२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १५ वरून थेट ३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. यावरून शहरात कोरोनाचा संसर्ग किती झपाट्याने पसरतो आहे, याची प्रचिती येते. विशेष म्हणजे, रिकव्हरी रेट अर्थातच कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही ८० टक्क्यांपर्यंत खालावल्याने चिंता वाढली आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा शहरात उद्रेक झाला. दिनांक १ मार्चपासून कोरोना रूग्णांमध्ये सतत वाढ होत चालली आहे. महिनाभरापूर्वीच जिल्ह्यात दररोज २० ते २५ कोरोना रूग्ण आढळून येत होते. मात्र, मागील तीन आठवड्यांत जिल्ह्यात दररोज हजारपेक्षा अधिक रूग्ण सापडत असल्याने केंद्र व राज्य सरकारनेही औरंगाबादेतील वाढत्या रूग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. शनिवारी जिल्ह्यात आजपर्यंतचे सर्वाधिक तब्बल १,६७९ रूग्ण आढळले. त्यात औरंगाबाद शहरातील १,२१७ कोरोनाचे नवीन रूग्ण होते. महापालिकेकडून प्राप्त अहवालानुसार शहराचा शनिवारच्या कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट तब्बल ३२ टक्के एवढा नोंदवला गेला आहे. म्हणजेच १०० कोरोना चाचण्यांमागे ३२ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. आजपर्यंतचा हा सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट ठरला असून, आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण १० हजार ४५८ सक्रिय रूग्ण असून, यापैकी ८ हजार १४० रूग्ण शहरातील आहेत, हे विशेष. त्यांना उपचार सेवा पुरविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. कोरोनाचा संसर्ग याच गतीने वाढत राहिल्यास शहरातील परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मृत्यूदर वाढल्याने रिकव्हरी रेट घटला
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच बाधित रूग्णांमधील मृतांमध्येही वाढ होत आहे. मागील तीनच दिवसात जिल्ह्यात ४० बाधितांचा मृत्यू झाला. दुसरीकडे मृतांचे प्रमाण वाढल्यामुळे कोरोनाचा रिकव्हरी रेटदेखील कमी झाला आहे. यापूर्वी शंभर टक्क्यांवर असलेला शहराचा रिकव्हरी रेट हा शनिवारी ८०.२६१ टक्के एवढा नोंदवला गेला.
तब्बल अडीच हजार रूग्ण घरीच
शहरातील वाढत्या रूग्णसंख्येमुळे उपचारासाठी खाटांच्या कमतरतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांना त्यांच्या घरीच गृह अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शनिवारपर्यंत तब्बल २ हजार ६१७ रूग्णांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.