राजेश खराडे बीडमार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने धडक कारवाई मोहिमेस महत्त्व दिले आहे. वसुलीसाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना मंडळातील जवळपास ३२ गावांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला असून, हजारो ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आक्रमक पवित्रा राबवूनही सरासरीएवढी वसुली दृष्टिक्षेपात दिसत नाही.लातूर परिमंडळात बीड मंडळाकडे सर्वाधिक थकबाकी आहे. कृषी पंपग्राहक सोडता ४०० कोटी थकबाकी इतर ग्राहकांकडे असून, वरिष्ठ कार्यालयाकडून ९४ कोटी वसुलीचे उद्दिष्ट मंडळास देण्यात आले आहे. महिन्याच्या सुरुवातीला अधिकारी, कर्मचारी ग्राहकांच्या दारी जाऊन सरासरी एवढी वसुली करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, ग्राहकांची उदासीनता पाहून अधीक्षक अभियंत्यांसह सर्वांना या मोहिमेत झोकून द्यावे लागत आहे. घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांबरोबरच पाणीपुरवठा, पथदिवे या शासकीय कार्यालयांकडेही कोटीची थकबाकी आहे. वरिष्ठांचा दबाव व मंडळाची प्रतिमा डागाळत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे. त्यानुसार बीड विभागातील शिरूर तालुक्यातील बावी, आनंदगाव येथील वीज पुरवठा खंडित केला असून, नादुरुस्त रोहित्र तसेच ठेवण्यात आले आहेत.गेवराई उपविभागाकडे सर्वाधिक थकबाकी असून, ११ गावांची वीज तोडण्यात आली असून, ५०० ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १ कोटींची थकबाकी आहे. पाटोदा तालुक्यातील ४ वाड्या-वस्त्यांवरील वीज बंद करून १२ ठिकाणचा पाणीपुरवठाही बंद केला गेला आहे. १२०० ग्राहकांकडे दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असल्याने तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित केला आहे.आष्टी तालुक्यातील काटेवडगाव, खिळद, पोयाल, खडकत या गावांची वीज गेल्या आठ दिवसांपासून बंद असून, या गावांकडे ४० रुपये एवढी थकबाकी आहे. महावितरणने कडक मोहीम राबवूनदेखील ग्राहकांची वीज बिले भरण्याविषयी उदासीनता दिसून येत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ग्राहकांच्या भेटीवर भर दिला असून, शासकीय कार्यालयाच्या दरबारीही वसुलीसाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अंबाजोगाई विभागातील लऊळ-२, एकबुर्जी, लोनवळ, मोहपूल तांडा, गायके वस्ती, तिगाव तांडा, खरवत लिंबगाव, निमला, मोठेवाडी, सिंगनवाडी, बोडखा, साळेगाव, कोथळा, महातारगाव आदी गावे थकबाकीमुळे अंधारात आहेत. तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची संख्या हजारांवर आहे.
३२ गावांना ‘शॉक’
By admin | Published: March 24, 2017 12:05 AM