लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात सोनोग्राफी सेंटर व इतर रुग्णालयांच्या झालेल्या तपासणीत ३२0 डॉक्टरांकडे परवानाच नसल्याचे आढळून आले होते. त्यांना आता जिल्हास्तरीय समितीने प्रत्येकी दहा हजारांचा दंड आकारण्याचा आदेश दिला आहे. ही कारवाई आता सुरू झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात बोगस डॉक्टर तपासण्यासह रुग्णालय तपासणीची मोहीम राबविली होती. यात जिल्ह्यातील अधिकृत डॉक्टरांची ४२२ रुग्णालये तपासली. मात्र त्यापैकी ३२0 जणांकडे बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार परवाना घेतलेला आढळला नाही. त्याचबरोबर इतरही अनेक त्रुटी तपासणीत आढळल्या होत्या. ही तपासणी जिल्हास्तरीय समितीच्या आदेशाने झाली होती. या समितीत जिल्हाधिकारी अनिल भंडारी अध्यक्ष तर जि.प.सीईओ एच.पी.तुम्मोड, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, सर्व न.प. मुख्याधिकारी, डीएचओ तर सदस्य सचिव हे जिल्हा शल्यचिकित्सक आकाश कुलकर्णी यांचा समावेश होता.दोन महिन्यांपूर्वी रुग्णालय तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल नुकत्याच झालेल्या बैठकीत ठेवला होता.त्यात परवाना न आढळलेल्या व त्रुटी असलेल्या ३२0 रुग्णालयांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्याच्या नोटिसा तयार करण्याचे काम सध्या सामान्य रुग्णालयाकडून सुरू आहे. देण्यात येत असलेल्या नोटिसीत संबंधित रुग्णालयात आढळलेल्या सर्व त्रुटींचा गोषवाराही दिला जाणार आहे. तर या त्रुटी दूर करण्यास सांगितले जाणार आहे. त्यामुळे आता रुग्णालयांना आपल्या भोंगळ कारभाराला लगाम घालावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.
३२0 डॉक्टरांना लावला दहा हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:32 AM