सोयगाव : तालुक्यात झालेल्या चार दिवसांच्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीच्या नुकसानीला जिल्हा प्रशासनाने ३३ टक्क्यांचा निकष अनिवार्य केला आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचेच पंचनामे होणार आहेत. त्यामुळे सोयगाव तालुक्यात बाधित क्षेत्राची आकडेवारी कमी करण्याचा शासनाचा हा डाव असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या नुकसानीतून वगळलेल्या सोयगावला पुन्हा नवीन निकषाचे संकट उभे राहिले आहे.
सोयगाव तालुक्यात सलग चार दिवस अवकाळी पाऊस झाला. यामध्ये काही भागांत मुसळधार पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. वादळी वारे आणि गारपिटीचा मोठा फटकाही बसला आहे; परंतु या नुकसानीच्या पंचनाम्याला जिल्हा प्रशासनाने ३३ टक्क्यांचा निकष लावला आहे. त्यामुळे तालुका कृषी विभागाच्या पाहणीतून ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आणि ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीच्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या काढल्या जात आहेत. त्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्याला विलंब होत असून, ३३ टक्क्यांचा निकष आणि ७२ तासांच्या जाचक अटीमुळे दोन्ही निकष शेतकऱ्यांना मारक ठरणारे आहेत.
तालुक्यात सोयगावसह ८४ महसुली गावांना अवकाळी आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे; परंतु शासन मात्र ३३ टक्क्यांच्या निकषावर अडून बसल्याने सोयगाव तालुक्याला अवकाळी आणि वादळी वारे, गारपिटीच्या मदतीतून वगळण्याची नवीन चाल शासन स्तरावर आखण्यात येत असल्याचा संशय शेतकऱ्यांना आहे.
अवकाळीमुळे रबीच्या नुकसानीची महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकांकडून पाहणी केली जात आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १४ गावे बाधित असल्याचा कृषी विभागाचा अहवाल सादर झाला आहे.
-प्रवीण पांडे, तहसीलदार, सोयगाव