औरंगाबाद : एसटी महामंडळाने उन्हाळी सुटी आणि लग्नसराईमुळे औरंगाबादहून विविध शहरांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा बसेसचे नियोजन केले आहे. औरंगाबाद विभागातून एकूण ३३ जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबाद विभागातील सिडको, मध्यवर्ती बसस्थानकाबरोबर गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव आणि पैठण येथून जादा बस सोडण्यात येणार आहेत. सिडको येथून मेहकर, रिसोड, अकोला, नागपूर, जालना, बीड या ठिकाणी जादा बस सोडण्यात येतील, तर मध्यवर्ती बसस्थानकातून नांदेड, बुलढाणा, नांदेड, अकोला या शहरांना जादा बस सोडल्या जातील. पैठणहून पुणे, सिल्लोड येथून जळगाव, बुलढाणा, नाशिक या मार्गावर जादा बसची वाहतूक केली जाणार आहे. वैजापूरहून नाशिकसाठी जादा बस राहतील.
कन्नडहून धुळे, गंगापूरहून अक्कलकोट, पुणे, शिर्डी, सोयगावहून पुणे, जळगाव व भुसावळ या शहरांसाठी जादा बसची वाहतूक केली जाणार आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्यास जादा बस वाढविण्याचाही निर्णय औरंगाबाद एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडून घेण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक किशोर सोमवंशी यांनी दिली.