आष्टी : तालुक्यात टंचाईच्या उपाययोजना करताना सुटीत विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरु ठेवावी असे आदेश आहेत. मात्र, तालुक्यातील एक शाळा सोडता इतर शाळांनी शासनच्या आदेशाला केराची टोपली दाखिवली आहे. केवळ पाण्याचा प्रश्न सांगता खिचडीला खोडा दिला असल्याने ३३ हजार विद्यार्थी खिचडीविना आहेत. शिक्षण विभाग मात्र याकडे डोळेझाक करीत आसल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.तालुक्यात जि.प. च्या २७५ तर खाजगी ७५ अशा ३५० शाळा आहेत. मात्र, यापैकी फक्त एका शाळेत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचाळा येथे मध्यान्ह भोजन योजना सुरू आहे. पहिली ते आठवी असे ३३ हजार विद्यार्थी आहेत. त्यांना पोषण आहार मिळावा यासाठी मिहन्याकाठी तेरा लाख रूपये खर्च शासन करत आहे. मात्र, आष्टी तालुक्यातील शिक्षण विभाग अपवाद ठरत आहे. उन्हाळी सुटीत दिला जाणारा पोषण आहार पाणी टंचाईचे कारण दाखवून दिला जात नसल्याने दुष्काळात तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे खिचडीपासून वंचित राहत आहेत.पाणी टंचाई असेल तर टँकरने पाणीपुरवठा करत खिचडी शिकवावी असे आदेश असतांना याकडे दुर्लक्ष का होत आहे ? मग शिक्षण विभाग मग लाखो रूपये खर्च का विनाकारण करत आहे ? शाळेत पोषण आहार न देणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी होत आहे. स्वयंपाकी, इंधन, भाजीपाला, बिस्कीट यासाठी दरमहा तेरा लाख रूपये खर्च होतो. गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव म्हणाले की, शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांनी पाणी नसल्याचे लेखी दिल्याने पोषण आहार दिला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
३३ हजार विद्यार्थी पोषण आहाराविना
By admin | Published: May 30, 2016 11:59 PM