पालोद, सिल्लोड, फुलंब्रीला प्रत्येकी ११० लसी पाठविल्या
औरंगाबाद : ग्रामीण भागासाठी कोव्हीशिल्ड या सीरम इन्स्टिट्यूटच्या १४ हजार मात्रा औषध भांडारात दाखल झाल्या आहेत. पालोद प्राथमिक आरोग्य केंद्र, सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय, फुलंब्री ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्येकी ११० लसींचे म्हणजे ३३० लसींचे वितरण शुक्रवारी करण्यात आले. लस घेऊन जाणाऱ्या या वाहनाला आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी हिरवा झेंडा दाखवला.
दिल्ली गेट येथील आरोग्य विभागाच्या औषध भंडारात पूजा करून या वाहनाला नारळ वाढविण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. गोपाळ कुडलीकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रकाश ब्रम्हकर, मुख्य औषध निर्माण अधिकारी उषा ढवणे, भागीनाथ थोरात, कृष्णा बोरसे, हिरालाल शेजवळ यांची यावेळी उपस्थिती होती.
डाॅ. शेळके म्हणाले, ग्रामीण भागासाठी १४ हजार डोस प्राप्त झाले आहे. १८ जानेवारीला पालोद प्राथमिक आरोग्य केंद्र येथून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पालोद, फुलंब्री ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय सिल्लोडसाठी ११० डोस लसींचे वितरण यावेळी करण्यात आले.
गलांडे म्हणाले, २८ दिवसांच्या अंतराने दोन डोस देण्यात येणार असून, पालोद आरोग्य केंद्र, वैजापूर, गंगापूर आणि सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय, कन्नड व पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. गणोरी, दाैलताबाद, मनूर हे केंद्र बदलण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
---
फोटोओळ .
पालोद येथे लस घेऊन जाणाऱ्या वाहनाला हिरवा झेंडा दाखविताना आरोग्य सभापती अविनाश गलांडे. समवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके, डाॅ. गोपाळ कुडलीकर, प्रकाश ब्रम्हकर, उषा ढवणे, भागीनाथ थोरात, कृष्णा बोरसे, हिरालाल शेजवळ.