गौसखा कालेखा पठाण (३५, रा. नाणेगांव) आणि नवाबखा उस्मानखा पठाण (४०, रा. गोद्री, ता. भोकरदन) या चोरट्यांना गत सप्ताहात सिटीचौक पोलिसांनी अटक केली. शहागंज, सिटीचौक,जामा मशीद परिसर, घाटी परिसरात दुचाकी चोरी करायची आणि भोकरदन, सिल्लोड तालुक्यातील गरीब शेतकरी, शेतमजूर यांना खोटे बोलून विक्री करणे असा फंडा या चोरट्यांचा होता. त्यांना पकडल्यापासून शहरातील दुचाकी चोरी कमी झाली. पोलीस कोठडी दरम्यान त्यांनी त्यांच्या अन्य दोन साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. शिवाय ४० दुचाकी चोरल्याचे कबूल केले होते. त्यांनी येथून चोरी केलेल्या दुचाकींपैकी पहिल्या टप्प्यात २२ दुचाकी, दुसऱ्या टप्प्यात ५ आणि तिसऱ्या टप्प्यात आणखी ७ अशा ३४ दुचाकी कुणाकुणाला विक्री केल्या हे सांगितले. पोलिसांनी आरोपींना सोबत नेऊन खरेदीदाराकडून या दुचाकी जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. आरोपीना बुधवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली आहे. असे असले तरी दुसऱ्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पोलीस त्यांना उद्या ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार आहेत. यासोबतच सर्व गुन्ह्यात त्यांना स्वतंत्र अटक केली जाईल आणि त्यांच्याविरूध्द स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल होईल. यामुळे हे आरोपी लवकर कारागृहातून बाहेर येणार नाही. पोलीस निरीक्षक पवार, भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार काशीनाथ महांडुळे, हवालदार रोहिदास खैरनार संजय नंद, संदिप तायडे, शेख गफ्फार,अब्दुल रहेमान, देशराज मोरे, संतोष शंकपाळ आणि अभिजीत गायकवाड हे तपास करीत आहेत.
चौकट
अनेक दुचाकींवरील नंबर बदलले, चेसीस खोडल्या
आरोपींनी दुचाकी चोरल्यावर त्या दुचाकीचे नंबर बदलून टाकले आणि चेसीस क्रमांक खाडाखोड केली. यामुळे अनेक दुचाकींचे खरे क्रमांक शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. आतापर्यंत सिटीचौक ठाण्याच्या हद्दीतील २० तर बेगमपुरा ठाण्याच्या हद्दीतील ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.