संतोष हिरेमठ, औरंगाबादराज्य परिवहन महामंडळाने शहर बससेवा सुरू केल्यानंतर प्रारंभी जवळपास ९० बसगाड्या धावत होत्या; परंतु गेल्या काही वर्षांत बसची संख्या हळूहळू कमी झाली. एसटी प्रशासनाचा अजब कारभार आणि नियोजनाच्या अभावामुळे आजघडीला १४ लाख लोकसंख्येसाठी शहरात केवळ ३४ बसगाड्या धावत आहेत. यामुळे वेळेत बससेवा मिळत नसल्याने प्रवाशांना नाइलाजाने रिक्षांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे शहरात सार्वजनिक वाहतूकव्यवस्था नसल्यासारखी परिस्थिती दिसूनयेते.शहरातील वाहतूकव्यवस्था सध्या एसटी महामंडळ सांभाळत आहे. २००६ मध्ये खाजगी संस्थेमार्फत छोट्या बसद्वारे येथे बससेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेचा सर्वाधिक लाभ सर्वसामान्य प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांना होत होता; परंतु २००९ मध्ये ही सेवा बंद पडली. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०१० रोजी राज्य परिवहन महामंडळाने शहर बससेवा सुरू केली.मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये बससेवा सुरळीत सुरू असल्याचे दिसते; परंतु औरंगाबादेत याउलट परिस्थिती दिसते. महामंडळाच्या अपुऱ्या सेवेमुळे प्रवाशांना अॅपेरिक्षा, रिक्षांद्वारे विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. शहरातील जालना रोड, रेल्वेस्थानक, सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकासह अन्य रस्त्यांवर प्रवाशांना कोंबून धावणाऱ्या रिक्षा दिसून येतात. अशा रिक्षांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. विद्यार्थ्यांना गेल्या काही वर्षांत शहर बससेवेच्या अपुऱ्या सेवेमुळे स्कूल बस, रिक्षांचा आधार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीमुळे दुप्पट पैसे मोजण्याची वेळ पालकांवर येतआहे.शहर बसमध्ये जवळपास ४४ आसन क्षमता आहे. सद्य:स्थितीला शहर बसचे भारमान केवळ ३७ टक्के आहे. भारमान वाढविण्यासाठी महामंडळाकडून विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे; परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रवासी शहर बसपासून दूर चालल्याचे दिसते.शहर बसचे मार्ग रिक्षा, अॅपेचालकांनी काबीज केलेले दिसून येतात. प्रत्येक बसथांब्याभोवती रिक्षा, अॅपेंचा विळखा दिसून येतो. त्यामुळे महत्त्वाच्या मार्गावरून शहर बसचे प्रवासी पळविले जातात. यामुळे बसच्या उत्पन्नाला मोठा फटका बसत आहे.प्रवाशांची संख्या कमीपावसाळी वातावरणामुळे सध्या शहर बसच्या प्रवशांची संख्या कमी आहे. या बससेवेत वाढ करण्याचे सध्या कोणतेही नियोजन नाही. नियोजनाप्रमाणे त्या-त्या मार्गावर दहा मिनिटांनी बस धावत असल्याचे राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांनी सांगितले.
१४ लाखांसाठी ३४ बस
By admin | Published: August 27, 2014 12:37 AM