औरंगाबाद : हैदराबाद येथून शहरात किरकोळ गांजा विक्रेत्यांना पुरवठा करण्यासाठी आणलेला ३४ किलो गांजा बेगमपुरा पोलिसांच्या पथकाने सापळा रचून पकडला. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. आरोपींकडून गांजासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक पाेतदार, उपनिरीक्षक विशाल बोडखे यांच्या पथकास आम्रपालीनगर भागात गांजा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोतदार, बोडके यांच्यासह उपनिरीक्षक विनोद भालेराव यांच्या पथकांनी आम्रपालीनगर भागात सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार एक इनोव्हा गाडी (एमएच २० सीएस ६७७७) विद्यापीठ गेटकडून आम्रपालीनगरकडे आली. गाडी संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता, थोड्या अंतरावर पुढे जाऊन गाडी जाऊन थांबली. गाडीतील चार जण गाडी सोडून पळून जात असताना पथकांनी त्यांना पकडले.
यात सुरेश रावसाहेब सागरे (रा. सुरेवाडी, जाधववाडी), सागर भाऊसाहेब भालेराव (रा. वाघलगाव, ता. फुलंब्री), संदेश दिलीप ठाकूर (रा. मयूरपार्क) आणि शंकर भीमराव काकडे (रा. आम्रपालीनगर, विद्यापीठ गेटसमोर) याचा समावेश आहे. या चौघांची पंचासमक्ष अंगझडती घेतल्यानंतर गाडीची तपासणी केली. तेव्हा गाडीच्या डिकीत दोन गोण्यांमध्ये ३४ किलो १९ ग्रॅम एवढा ४ लाख ८ हजार २२२ रुपयांचा अवैध गांजा आढळून आला. त्याशिवाय पोलिसांनी ७ लाखांची इनोव्हा कार, २२ हजार रुपयांचे चार मोबाईलसह रोख २३० रुपये असा ११ लाख ३० हजार ४५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी निरीक्षक पोतदार, उपनिरीक्षक विशाल बोडखे, भालेराव, हवालदार हैदर शेख, शिवाजी कचरे, विजय निकम, शरद नजन, ज्ञानेश्वर ठाकूर, सुदर्शन एखंडे, उमेश चव्हाण, सुप्रिया मुरकुटे, शिल्पा तेलुरे यांच्या पथकाने केली. अधिक तपास निरीक्षक पोतदार करीत आहेत.
तीन आरोपी रेकॉर्डवरीलबेगमपुरा पोलिसांनी गांजा घेऊन जाताना पकडलेल्या चारपैकी तीन आरोपी रेकॉर्डवरील आहेत. त्यात सुरेश सागरे, संदेश ठाकूर आणि शंकर काकडे यांचा समावेश आहे. या चार आरोपींशिवाय इतरही काही जण गांजा विक्रीच्या कटात सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पाच दिवसांची पोलीस कोठडीआरोपींना अटक केल्यानंतर बुधवारी न्यायालयात हजर केले. बेगमपुरा पोलिसांनी गांजा विक्रीमध्ये आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. ही मागणी मान्य करीत न्यायालयाने चार आरोपींना ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.