- अबोली कुलकर्णी
औरंगाबाद : बेरोजगारी ही समाजाला लागलेली कीड आहे. बेरोजगारीचे प्रमाण कमी करायचे असल्यास विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे असते. बेरोजगारीच्या प्रश्नावर तोडगा शोधून काढण्यासाठी ‘कम्युनिटी पोलिसिंग’ या उपक्रमातून शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी विविध उपक्रम हाती घेतले. आॅगस्ट २०१८ पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत ३४,००० महिलांना रोजगार मिळाला आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजात सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी म्हणून ‘कम्युनिटी पोलिसिंग’ या उपक्रमांतर्गत शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यातर्फे विविध कामे हाती घेण्यात आली. शहरातील आंबेडकरनगर, मिसारवाडी, नारेगाव, वडगाव कोल्हाटी, इंदिरानगर, मोतीकारंजा, सिल्लेखाना यांसारख्या अनेक झोपडपट्टी भागात हे उपक्रम राबवण्यात आले. या भागातील वाढती बेरोजगारी, गुन्हेगारी, नशेखोरी यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या उपक्रमातून ३४ हजार महिलांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. कापडी पिशव्या बनवणे, शिलाई मशीन वाटप, मशीनवर वाती तयार करणे, अगरबत्ती-मेणबत्ती बनवणे, निर्माल्याचा पुनर्वापर, ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण, एलईडी बनवण्याचे प्रशिक्षण, दिवाळीचे साहित्य बनवणे, प्रशिक्षण तसेच कच्चा माल पुरवणे, ६ स्टडी सेंटरची स्थापना या कामांद्वारे महिलांना रोजगार मिळवून देण्यात आला. महिलांना सिक्युरिटी गार्ड, हेल्पर म्हणूनदेखील काम मिळाले आहे. या उपक्रमांतर्गत सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, डॉ. किशोर उढाण, अविनाश जोशी, स्वप्नील विटेकर, पोलीस हवालदार सुखमानंद पगारे हे परिश्रम घेत आहेत.
माझा घरगुती शेवयांचा गृहउद्योग आहे. ‘कम्युनिटी पोलिसिंग’ या उपक्रमांतर्गत मी प्रोझोन मॉल येथे झालेल्या कार्यक्रमात स्टॉल लावला होता. माझा व्यवसाय वाढला. - पूजा अविनाश अंधारीकर (उद्योजिका)
‘कम्युनिटी पोलिसिंग’ या उपक्रमामुळे महिलांना रोजगार मिळाला. नागरिक आणि पोलीस यांच्यातील दुरावा कमी झाला. पोलीस यंत्रणा जनतेच्या हितासाठीच ही यंत्रणा काम करत असते. नागरिकांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आम्हाला बळ देते. - घनश्याम सोनावणे, निरीक्षक, पुंडलिकनगर पोलीस ठाणे
महिला-तरुणांंना योग्य दिशा दाखविण्याचा उद्देश बेरोजगारीमुळे समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढते. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याने ‘कम्युनिटी पोलिसिंग’ या उपक्रमाच्या अंतर्गत कामे आम्ही हाती घेतली. महिलांना घर सांभाळून स्वत:च्या पायावर उभे राहता यावे या दृष्टीने काही प्रशिक्षण वर्ग घेतले. कमीत कमी खर्चात त्यांना कशाप्रकारे स्वावलंबी बनवता येईल, याचा विचार केला. आज त्या महिला खंबीरपणे आपल्या कुटुंबाचा भार उचलू शकत आहेत.- चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त