वैजापूर : येथील खरेदी-विक्री महासंघाच्यावतीने खरेदी करण्यात आलेला ३४३ क्विंटल मका सरकारी गोदामामधून गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रशासनासह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून यातून मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्र शासनाने वैजापूर खरेदी-विक्री संघामार्फत ३० मे ते ३० जुलै २०२० या कालावधीत २३ हजार ४११ क्विंटल मका खरेदी केली. या मक्याची ऑनलाईन नोंदणी झाली. मात्र उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर व ऑनलाईन पोर्टल बंद झाल्यानंतरही खरेदी-विक्री संघाने १० शेतकऱ्यांकडील ३४३ क्विंटल मका खरेदी केली. त्यामुळे या मक्याची लाॅट नोंदणी झाली नसल्यामुळे या १० शेतकऱ्यांना मक्याचे पेमेंट मिळाले नाही. तेव्हापासून पैसे मिळविण्यासाठी हे शेतकरी चकरा मारीत आहेत. मात्र नोंदणी नसल्याने केंद्र शासन संबंधित शेतकऱ्यांचे पेमेंट करू शकत नसल्याने, हा मका शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी खरेदी-विक्री संघाला दिले आहेत. मात्र गोदामामध्ये मकाच शिल्लक नसल्याने या शेतकऱ्यांकडील खरेदी केलेला मका गायब झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खरेदी-विक्री संघासोबतच तालुका प्रशासनाचीही झोप उडाली आहे.
कोट....
खरेदी-विक्री संघाचा संबंध नाही
खरेदी-विक्री संघामार्फत आम्ही जी मका खरेदी केली, त्यानंतर तो सर्व मका तहसील प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणात आमचा काहीही संबंध नाही.
- साहेबराव पाटील औताडे, चेअरमन, खरेदी-विक्री संघ वैजापूर.
चौकट
मका खरेदीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
मागील ३-४ दिवसांपासून शासकीय खरेदी केंद्रावर वाहने घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा मका, मुदत संपली म्हणून घेण्यास खरेदी-विक्री संघाने नकार दिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आवारात असलेल्या ८५ वाहनांतील मका खरेदी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केले होते.
दरम्यान, खरेदी केंद्रावर उभ्या असलेल्या वाहनांचा पंचनामा करण्याचे आदेश अप्पर तहसीलदार निखिल धुळधर यांनी दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिल्यावर हा मका खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.