छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उद्या रविवार, दि. ७ मे रोजी राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात ‘नीट’चे आयोजन शहरातील ३५ केंद्रांवर करण्यात आले आहे. या परीक्षेला २० हजार विद्यार्थी सामोरे जाणार असून, दुपारी २ ते ५.२० या वेळेत परीक्षा होणार आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत ‘नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट’ घेतली जाणार असून या परीक्षेचे प्रवेशपत्र ‘एनटीए’च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १.१५ वाजेपासून परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार असून १.३० वाजेनंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. दुपारी १.३० ते १.४५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी महत्त्वाची माहिती दिली जाईल. त्यानंतर पावणेदोन वाजता प्रश्नपत्रिका दिली जाईल. दुपारी १.५० ते २ या वेळेत विद्यार्थ्यांना आवश्यक तपशील उत्तरपत्रिकेत भरण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. दुपारी बरोबर २ वाजता पेपर सुरू होईल आणि संध्याकाळी ५.२० पर्यंत चालेल.
छत्रपती संभाजीनगर शहरात ३५ केंद्र आणि जालना शहरात १ केंद्र आहे. या सर्व केंद्रांवर एकूण २० हजार ७०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र- जैवतंत्रज्ञान या विषयांवरील १८० बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. हे प्रश्न ११ वी आणि १२ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील.