औरंगाबाद : शहर पोलिसांना विविध गुन्ह्यांत तब्बल दीड हजार गुन्हेगार सापडत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी फरार गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर पहिल्या टप्प्यात ३५ फरारींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाकडून मिळविल्याची माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
याविषयी अधिक माहिती अशी की, शहर आयुक्तालयांतर्गत विविध गुन्ह्यांत १,५२४ गुन्हेगार १५ ते २० वर्षांपासून पोलिसांना सापडत नसल्याचे वृत्त दि.२ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्तामध्ये कोणत्या पोलीस ठाण्यांतर्गत किती आरोपी पोलिसांना हवे आहेत, याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली होती. ‘लोकमत’ने दिलेल्या या वृत्ताची गंभीर दखल पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी घेतली. यानंतर त्यांनी संबंधित गुन्हेगारांना कोर्टाकडून फरारी घोषित करणे आणि त्यांची चल-अचल संपत्ती जप्त करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधिका-यांना दिले. आदेश प्राप्त होताच पोलीस ठाणेप्रमुखांनी त्यांना वॉन्टेड असलेल्या गुन्हेगारांविरोधात कारवाई सुरू केली.
पहिल्या टप्प्यांत ३५ गुन्हेगारांना फरारी घोषित करण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळविले. याबाबतची नोटीस आरोपीच्या घराच्या दारावर आणि प्रमुख चौक, गर्दीच्या ठिकाणी लावण्याची कार्यवाही सुरू झाली. महिनाभरात हे आरोपी हजर न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाकडून घेतला जाणार आहे.
औरंगाबाद शहरात प्रथमच कारवाईयाविषयी बोलताना पोलीस आयुक्त यशस्वी यादव म्हणाले की, गुन्हा केल्यापासून पसार झालेले आरोपी न सापडल्यास त्यांना फरार घोषित करून त्यांची संपत्ती जप्त करण्याची कायदेशीर कारवाई पोलिसांना करता येते. मात्र, आजपर्यंत शहर पोलिसांनी अशी कारवाई केली नव्हती. परिणामी, वॉन्टेड गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. ही बाब गंभीरतेने घेत आम्ही आता वॉन्टेड गुन्हेगारांना सीआरपीसी सेक्शन ८२ नुसार फरारी घोषित करण्याची आणि नंतर कलम ८३ नुसार त्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू केली. पहिल्या टप्प्यात ३५ गुन्हेगारांची संपत्ती जप्त केली जात आहे.