दाभाडी: बदनापूर तालुक्यातील नागठाणा येथे मागील तीन चार दिवसांपासून अज्ञात तापाची साथ पसरली आहे. गावातील लहान मोठे मिळून ३५ जण तापाने फणफणले आहे. दरम्यान, त्यातील एकास डेंग्यूसदृश्य तापाची लक्षणे आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. गावातील विकास प्रकाश शिंदे, सचिन राजेंद्र बनकर, राहुल बनकर, संगीता बनकर, कालिका आनंदा सोनवणे, नितीन शिंदे, प्रमोद शिदे, सावित्राबाई सोनवणे आदींचा रुग्णांत समावेश आहे. यातील काहींना राजूर येथे तर काहींना जालना येथे खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. यातील विलास शिंदे (१९) या तरुणावर जालना येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तेथे रक्त तपासणीत त्याला डेंग्यू सदृश्य तापाचे लक्षणे आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सरपंच व ग्रामस्थांनी या बाबत तालुका आरोग्य अधिकार्यांना एका निवेदनाद्वारे कळविले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनटक्के यांनी तात्काळ दाभाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. जोशी व त्यांच्या पथकास गावात भेट देण्याच्या सूचना केल्या. तसेच ग्रामपंचायतला गावात धूर फवारणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
नागठाण्यात तापाचे ३५ रुग्ण; एक डेंग्यूसदृश्य
By admin | Published: June 01, 2014 12:17 AM