औरंगाबाद : जिल्हा व्यापारी महासंघाच्या सहकार्याने महापालिकेकडून शहरातील व्यापाऱ्यांची विविध भागात सहा पथकांमार्फत कोरोना चाचणी केली जात आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी ८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेव्हापासून शनिवारपर्यंत मागील ६ दिवसात तब्बल ३५९ व्यापारी, कामगारांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यावरून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरला असल्याचे निदर्शनाला येत आहे.
शहरात कोरोना संसर्ग गतीने फैलावत असल्याने व्यापारी, हातगाडीचालक, फळ-भाजी विक्रेते यांच्या कोरोना चाचण्या महापालिकेकडून केल्या जात आहेत. शहरात सहा ठिकाणी स्वतंत्र तपासणी शिबिर घेतले जात आहे. पहिल्या दिवशी सोमवारी सर्वच केंद्रांवर तपासणी करुन घेण्यासाठी व्यापाऱ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. मागील सहा दिवस हेच चित्र कायम दिसून आले. विशेष म्हणजे दररोज ५०पेक्षा अधिक व्यापारी, कामगार पॉझिटिव्ह येत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सोमवार ते शनिवार या मागील सहा दिवसात तब्बल ३५९ व्यापारी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनानेही चिंता व्यक्त केली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी ८०, मंगळवारी ६१, बुधवारी ५४, गुरूवारी ५७, शुक्रवारी ५० आणि शनिवारी पुन्हा ५७ याप्रमाणे मागील सहा दिवसात एकूण चाचण्यांतून व्यापारी, कामगार पॉझिटिव्ह निघाले आहेत. यावरून शहरातील बाजारपेठा, भाजी मंडई, आठवडा बाजार या ठिकाणांहूनच शहरात कोरोनाचा संसर्ग पसरत गेल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, घराबाहेर जाताना मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.