लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वाळूज औद्योगिकनगरीत तोडफोड प्रकरणाचा तपास गतीने व्हावा, यासाठी पोलिसांनी ७ पथकांची स्थापना केली असून, सीसीटीव्ही फुटेजवरून ३६ संशयित हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. तपास पथकाकडून विशेष कोंबिंग आॅपरेशन राबवून धरपकड सुरू आहे.९ आॅगस्टला पुकारण्यात आलेल्या बंदला वाळूज औद्योगिकनगरीत गालबोट लागले होते. उद्योगनगरीत झालेल्या हल्ल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. या तोडफोडप्रकरणी आतापर्यंत ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ६० कोटींचे नुकसान झाल्याची तक्रार उद्योजकांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. या तोडफोड प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी ७ पथके स्थापन केली आहेत. या पथकावर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नुकसानीचा आढावा घेणे, तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींचा शोध घेणे, आदी कामे पथकाकडे सोपवून जलदगतीने तपास करण्याच्या सूचना पथक प्रमुखाला देण्यात आल्या आहेत.तोडफोडीचे चित्रीकरण द्या -पोलिसांचे आवाहनतोडफोड करणारे हल्लेखोर कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. अनेकांनी मोबाईलद्वारे चित्रीकरण केलेले आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. तोडफोडीचे व्हिडिओ असल्यास संबधितांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मोबाईलवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून, संबंधितांची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे.
वाळूज एमआयडीसी तोडफोडप्रकरणी ३६ समाजकंटकांना आतापर्यंत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:55 AM