वाळूज महानगर : चार महिन्यांपूर्वी मेहुण्याच्या घरात साल्यानेच हात मारला. साथीदाराच्या मदतीने चोरी केलेल्या ४० लाखांपैकी ३६ लाख रुपये व चोरीच्या पैशातून खरेदी केलेले दागिने पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने मेहुण्याला परत केले.
बगतसिंह हरिसिंह (४२, रा. सिडको, वाळूज महानगर) हे सोलापूर- धुळे महामार्गावरील साजापूर फाटा येथे मुकुल गोयल विकास पाइप आणि स्टील या ठिकाणी वसुलीचे काम करतात. चार महिन्यांपूर्वी बगतसिंह यांचा साला दशरथसिंह क्रांतिसिंह (२५, रा. राजस्थान) याने मेहुणा बगतसिंह यांच्या घरातून ४० लाखांची बॅग चोरली होती. या चोरीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित आरोपी दशरथसिंह यास मध्य प्रदेशात मौजमजा करताना जेरबंद केले. पोलिस तपासात दशरथसिंह याने प्रदीपकुमार जगदीश जोशी याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली होती. यानंतर पोलिस पथकाने प्रदीपकुमार जोशी यास ताब्यात घेतले होते. आरोपी दशरथसिंह व प्रदीपकुमार यांच्या ताब्यातून पोलिसांनी ३५ लाख ८० हजार रुपये जप्त केले होते. उर्वरित पैशातून या दोघा आरोपींनी सोन्याच्या दोन अंगठ्या, दोन सोन्याच्या चेन व मोबाइल खरेदी केले होते.
पोलिसांनी मेहुण्याला ३६ लाख केले परतआरोपीच्या ताब्यातून जप्त केलेले ३५ लाख ८० हजार रुपये न्यायालयाने मूळ मालक मेहुणा बगतसिंह यांना परत देण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नितीन बगाटे, सहा. आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, दुय्यम निरीक्षक गणेश ताठे, सहा. फौजदार कडू, पेद्दावाड, पोहेका. राजाभाऊ कोल्हे यांनी फिर्यादी बगतसिंह यांना ३५ लाख ८० हजार रुपये तसेच चोरीच्या पैशातून खरेदी केलेले दागिने व मोबाइल परत दिला. पोलिसांमुळे चोरी झालेला ऐवज परत मिळाल्याने बगतसिंह यांनी पोलिसांचे आभार मानले.