छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-ऑगस्टमध्ये घेलतलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यात दहावीचा निकाल ३७.२५ टक्के तर बारावीचा ४९.६४ टक्के एवढा लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी आणि पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिक्षण मंडळाने अनुतीर्ण झालेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलै- ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. दहावीच्या पुरवणी परीक्षेला औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातुन ५ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५ हजार ९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. त्यातील १ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.२५ एवढी आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबर २०२१ मध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेत ३१.६४ टक्के, जुलै- ऑगस्ट २०२२ मध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेत ३९.७६ टक्के विद्यार्थी औरंगाबाद विभागात उत्तीर्ण झाले होते.
बारावीच्या पुरवणी परीक्षेत औरंगाबाद विभागात ४ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ४ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. टक्केवारी ४९.६४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सप्टेंबर-ऑक्टोंबर २०२१ मध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेत ३६ टक्के, जुलै- ऑगस्ट २०२२ मध्ये ४८ टक्के एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी पावणेदोन टक्क्यांनी उत्तीर्णतेचे प्रमाण वाढले आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी आणि पदवीच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.