औरंगाबाद : महापालिकेत २०१६ साली समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई भागात ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी २००, नवीन गुंठेवारी भागात ड्रेनेजलाइनसाठी १७५ असा ३७५ कोटींचा प्रस्ताव निधी मिळण्याच्या आनुषंगाने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला जाणार आहे, असे मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नगरविकासमंत्री शिंदे दि. १३ फेब्रुवारी रोजी मनपात एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी आणि विकासकामांचा आढावा बैठक घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनपा सेवाभरती नियम व आकृतिबंधाला मंजुरीसह सातारा-देवळाई भागात सुविधांच्या दृष्टीने २०० कोटींच्या निधीची मागणी केली जाणार आहे. गुंठेवारीबाबत झालेला शासन निर्णय लवकरच येईल. तसेच ज्या गुंठेवारी भागात मलनिस्सारण वाहिनी टाकलेली नाही, त्याठिकाणी १७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असे प्रशासकांनी सांगितले.
आता रस्त्यांसाठी निधी मागणार नाही
शहरात दोन वर्षांत सुमारे ५०० कोटींचे रस्ते झाले आहेत. राज्य सरकारच्या निधीतून केलेल्या रस्त्यांची कामे निविदाप्रमाणे करून घेतली जातील. पुढील वर्षाच्या मनपा बजेटमध्ये ५० कोटींच्या निधीची तरतूद करुन त्यातून रस्त्याची कामे केली जातील. शहरातील रस्त्यासाठी आता सरकारकडे निधीची मागणी करणार नसल्याचे प्रशासक पाण्डेय यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------------------------
उपायुक्तपदी शिवाजी गवळी रुजू
औरंगाबाद : महापालिकेत रिक्त उपायुक्तपदी शिवाजी गवळी गुरुवारी रुजू झाले. शासनाने त्यांची पालिकेत बदली केल्यानंतर ते दीर्घ सुटीवर गेले होते. ते आज रुजू होताच प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यांना महिला व बाल विकास, दिव्यांग कक्ष, जनगणना विभागाची जबाबदारी दिली.