हिंगोली : बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खाजगी वाहने लावणाऱ्या तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिस प्रशासन तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत जिल्ह्यामध्ये १० ते २० फेबु्रवारी या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात ३८९ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख १९ हजार ३०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.मुंबई उच्च न्यायालय यांच्या जनहित याचिकेनुसार बसस्थानक परिसर, अवैध प्रवासी वाहतूक व खाजगी बसेसवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने ९ फेबु्रवारी रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात प्रवासी समन्वय समितीची बैठक घेऊन उपप्रादेशिक परिवहन व जिल्हा पोलिस दलातर्फे नियोजन करण्यात आले. विशेष फिरते पथकाची नेमणूक करण्यात आली. जेणेकरून अवैध वाहतूक करणाऱ्यांना आळा बसेल. तसेच प्रवाशांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार नाही. याची खबरदारी घेत विविध ठिकाणी कारवाई करून संबंधित वाहनचालकांवर केसेस करण्यात आल्या आहेत.उपप्रादेशिक परिवहन व पोलिस दलामार्फत मोहिमेतंर्गत २६ खाजगी प्रवासी बस, जीप ४७ व आॅटोरिक्षा ३१६ एकूण ३८९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आल्याची माहिती मोटारवाहन निरीक्षक नितीन जाधव यांनी दिली. सदर कारवाई पोलिस अधीक्षक कैलास कणसे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. संयुक्त पथकामध्ये सुदेश कुंदकुर्तीकर व एपीआय गुलाब बाच्छेवाड यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मुख्य चौक व स्थानक परिसरात सदर मोहीम राबविण्यात आली. (प्रतिनिधी)
३८९ वाहनांवर कारवाईचा बडगा
By admin | Published: February 23, 2016 11:56 PM