औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दोन टप्प्यांत पार पडलेल्या सर्व पदवी परीक्षांचे बहुतांश निकाल जाहीर झाले. या परीक्षेदरम्यान भरारी पथकांना २० जानेवारीपर्यंत ३८६ काॅपीबहाद्दर आढळून आले. विद्यापीठ कायद्यातील ४८ (५) (ए) नुसार स्थापन सत्यशोधन समितीसमोर सुनावणीनंतर पुढील बैठकीत या काॅपीबहाद्दरांवरील कारवाई निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ.गणेश मंझा यांनी दिली.
बी.ए., बी.एस्सी व बी.कॉम अभ्यासक्रमाची द्वितीय व तृतीय वर्षाची परीक्षा २२ नोव्हेंबरपासून सुरू झाली, तर प्रथम वर्ष बी.ए., बी.एस्सी व बी.कॉम प्रथम सत्राच्या परीक्षा २२ डिसेंबरपासून सुरू झाली. पहिल्या टप्पात तांत्रिक अडचणी तर दुसऱ्या परीक्षा केंद्रावरील गोंधळ, परीक्षेपूर्वी उत्तरे विद्यार्थ्यांकडे मिळाल्याचे प्रकार समोर आले. त्या प्रकरणांची कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले यांनी गंभीर दखल घेतली. पदवी अभ्यासक्रमासाठी चार जिल्ह्यात २४० परीक्षा केंद्रावर १ लाख ४८ हजार ९१७ विद्यार्थी कला व सामाजिकशास्त्र, ४३ हजार ३६९ वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र तर १ लाख १९ हजार ९२३ विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतून अशा साडेतीन लाख पदवी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यासाठी जिल्हानिहाय भरारी पथके नेमण्यात आली होती.
काॅपीमुक्त परीक्षेचे आवाहन करूनही काही केंद्रावर गैरप्रकार आढळून आले. भरारी पथक, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांसह, परीक्षा भवनच्या पथकाने केलेल्या कारवाईत ३८६ गैरप्रकारांची नोंद झाली आहे. त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली. त्या विद्यार्थ्यांच्या सुनावणीनंतर सत्यशोधन समिती अहवाल देईल. त्या अहवालातील शिफारशीनुसार पुढील कारवाई करू, असे कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले यांनी सांगितले.
विषयनिहाय गैरप्रकारविषय - गैरप्रकारबी.ए. -११९बी.काॅम -५५बी.एसस्सी -१४१बी.सी.ए. -४५बी.बी.ए.-९बी.एससी (संगणकशास्त्र) -१७