काळू म्हस्के
वडोद बाजार : वडोद बाजार ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, गावातील पारावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यंदाच्या निवडणुकीत नवीन उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये भालगाव, डोह खुर्द (वाडी), वडोद बाजार या तीन गावांचा समावेश आहे. एकूण १५ सदस्यांची ही निवडणूक आहे. दोन पॅनल एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवीत असून, ३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. एकूण ५,०२० मतदार आहेत.
यावर्षीच्या निवडणुकीत एकही विद्यमान सदस्य उतरलेला नाही. त्यांचे नातेवाईक असलेले नवीन चेहरे या निवडणुकीत समोर आले आहेत, तर दहा वर्षांपूर्वी माजी सरपंच राहिलेल्या राणीबाई तोरणमल या निवडणुकीत आपले नशीब अजमावत आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य शिवराम म्हस्के हेदेखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांच्याविरोधात त्यांचाच चुलत पुतण्या लक्ष्मण कडुबा म्हस्के उतरला आहे, तर सर्वांत कमी वयाचा उमेदवार म्हणून आकाश भिवसाने निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.
--------
हायटेक प्रचार
गावातील निवडणुकीत यंदा प्रचारासाठी हाय टेक तंत्रज्ञान वापरले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवा कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. प्रचाराचा नुसताच धुराळा उडताना गावांमध्ये दिसून येत आहे. ऑडियो-व्हिडिओमध्ये उमेदवारांच्या क्लिप व्हायरल केल्या जात आहेत, तर बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना मतदानासाठी या, अशी आर्त हाक फोनवरून घातली जात आहे.
------
वॉर्डनिहाय मतदार संख्या
वॉर्ड क्रमांक १ मध्ये एकूण १,०३९ मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष ५४३ व महिला ४९६ मतदार आहेत. वॉर्ड क्रमांक २ मध्ये एकूण ९९७ मतदार आहेत. यात महिला ४६८ आणि ५२९ पुरुष मतदारांचा समावेश आहे. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये एकूण ९९७ मतदार असून, ५१७ पुरुष, ४८० महिलांचा समावेश आहे. वॉर्ड क्रमांक ४ मध्ये १,००५ मतदार असून, त्यात ५२८ पुरुष ४७७ महिलांचा समावेश आहे. वॉर्ड क्रमांक ५ मध्ये १,०३९ मतदार असून, ५०२ पुरुष, ४८० महिलांचा समावेश आहे.
------
- वडोद बाजार ग्रुप ग्रामपंचायतीचे छायाचित्र.