औरंगाबाद : आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथून औरंगाबाद शहरातील रेल्वेस्थानकावर ( Auranagbad railway Station ) आलेला ३९ किलो गांजा ( cannabis seized ) उस्मानपुरा पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पकडला. यासोबतच एक पुरुष व दोन महिलांनाही अटक करण्यात आली. या तीन आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची कोठडी देण्यात आली.
उस्मानपुरा पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना रेल्वेस्थानकावर आंध्रप्रदेशातून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. यानंतर निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सर्व परवानग्या मिळवत सापळा रचला. यानुसार एक पुरुष व दोन महिला नऊ वाजता रेल्वेस्थानकातील पार्किंगमध्ये हातात प्रवाशी बॅगसह दाखल झाले. त्यांच्याकडे एकूण चार बॅगा होत्या. या सर्व बॅगांची झाडाझडती घेतली असता, प्लास्टिकच्या आवरणामध्ये १९ पाकिटे आढळून आली. त्या सर्व पाकिटांमध्ये ३९ किलो गांजा हा अमली पदार्थ मिळून आला. या गांजाची एकूण किंमत २ लाख ७३ हजार रुपये एवढी आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये गोविंदा मनी आरली (३८), लाऊ अम्मा रामू आरली (४०) आणि मनय्या अप्पाराव पिल्ले (३०, सर्व रा. तोडवा, नलंका पिल्ली, विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश) यांचा समावेश आहे. ही कारवाई निरीक्षक बागवडे, सहायक निरीक्षक सूर्यतळ, हवालदार लांडे पाटील, नाईक अय्यूब पठाण, विश्वनाथ गंगावणे, अंमलदार अशरफ सय्यद, ज्ञानेश्वर कोळी, याेगेश गुप्ता, सतीश जाधव, प्रकाश सोनवणे, कोमल निकाळजे यांच्या पथकाने केली.
... अन् भाषेची झाली अडचणपोलिसांनी ३९ किलो गांजासह दोन महिला व एका पुरुषाला अटक केली. या तिघांनाही तेलुगूशिवाय इतर कोणतीही भाषा येत नव्हती. आरोपींना त्यांचे नाव विचारले तरीही समजत नव्हते. त्यामुळे पोलिसांना त्यांच्याशी संवाद साधण्यात प्रचंड अडचणी निर्माण झाल्या. शेवटी तेलुगू येत असलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन दुभाषिकाच्या माध्यमातून आरोपींची चौकशी करण्यात आली. आगामी कोठडीच्या काळातही भाषेची समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.