औरंगाबाद : चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर येथे रुग्णांसाठी अद्ययावत ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन दिवसांपूर्वीच महापालिकेला निधी मंजुरीचे पत्र दिले. ऑक्सिजन टँकच्या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया आधीच राबविलेली आहे. निधी मंजूर झाल्याने आता येत्या दोन दिवसात पात्र एजन्सीला कार्यारंभ आदेश दिले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांना मेल्ट्रॉन येथे उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने २० केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक उभारण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेतला. निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. महापालिकेकडे निधी नाही. आरोग्य विभागाने या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडे ८ कोटी रुपयांची मागणी केली. यात ऑक्सिजन टँक उभारण्यासोबतच इतर काही महत्त्वाच्या कामांचा समावेश होता. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर मनपाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नव्याने पाठपुरावा सुरू केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीतून या कामासाठी मनपाला ४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याबाबतचे पत्र मनपाला दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून मिळाले. त्यामुळे दोन दिवसात प्रशासक पांडेय यांची मंजुरी घेऊन पात्र एजन्सीला कामाचे कार्यारंभ आदेश दिले जातील आणि लगेचच कामाला सुरूवात होईल, असे सूत्रांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त निधीतून ऑक्सिजनची यंत्रणा उभारणे, डिजिटल एक्स-रे मशीन खरेदी केली जाईल.
कोरोनासाठी मोठा आधारमेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये सध्या ३०० बेडची व्यवस्था आहे. १२८ बेडला ऑक्सिजनची व्यवस्था आहे. गंभीर रुग्णांसाठी अधिक प्रमाणात ऑक्सिजन लागतो. मागील पाच महिन्यापासून महापालिकेकडून हे हॉस्पिटल चालविण्यात येत आहे.