औरंगाबाद : मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे राज्य सरकारने २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला होता. यानुसार शासनाकडून ४ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्राप्त झाला होता. हा निधी विद्यापीठाने महाविद्यालयांना पाठविला. मात्र, हा निधी महाविद्यालयांनी हडप केल्याचा आरोप मराठवाडा लॉ कृती समितीने केला आहे.
महाविद्यालयांनी परीक्षा शुल्काच्या मिळालेल्या निधीचे वाटप विद्यार्थ्यांना केले नाही. तसेच शासनालाही परत पाठविला नाही. सर्व निधी महाविद्यालयांकडेच अखर्चित आहे. या निधीचे महाविद्यालयांनी काय केले, याची माहितीही संबंधितांकडे उपलब्ध नाही. ही रक्कम हडप करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांना देण्यात आले. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे पैसे संबंधितांना देण्याची जबाबदारी महाविद्यालयांची असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उच्चशिक्षण विभागाची असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या पैशांचा योग्य तो शोध घेऊन संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांना त्याचे १५ दिवसांत वाटप करण्यात यावे, अन्यथा विद्यापीठ, महाविद्यालय आणि उच्चशिक्षण विभागाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नवनाथ देवकते, राम टकले, रवी गिते, विश्वजित बडे, अजहर पटेल, अश्फाक पठाण, ऋषभ लोहाडे, सुदर्शन धुमक, मनोहर जाधव, मनीषा हाडे, कृष्णा साबळे, दीपक डोईफोडे, विजय काळे, शिल्पा मुंडे, ऋचा कुलकर्णी, अलका मुंडे, पराग रणदिवे, अजय मरसाळे यांच्या स्वाक्षºया आहेत.--------------