गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या हक्काच्या आणि त्यांना वाटप करावयाच्या १५ कोटी ७५ लाख ३३ हजार ३३८ रुपयांचा अपहार केल्याच्या कृष्णा साहेबराव पाटील डोणगावकर यांनी केलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात १८ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील एका महिला आरोपीला ताब्यात घेतले होते. पोलीस अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आल्यावर त्या महिलेला सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात आमदार प्रशांत बंब हे प्रमुख आरोपी असल्यामुळे गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ४ फेब्रुवारी रोजी आयपीएस अधिकारी गोरख भामरे यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली. एसआयटीने तपास सुरू केल्यापासून आरोपीविरुध्द पुरावे गोळा करण्यावर भर दिला. या प्रकरणातील आरोपी आ. प्रशांत बंब हे बुधवारी दुपारी १२ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात एसआयटी प्रमुख भामरे यांच्यासमोर हजर झाले. ४ वाजेपर्यंत पोलिसांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी बंब यांनीही पोलिसांना देण्यासाठी काही कागदपत्रे सोबत आणली होती. बंब यांनी चौकशीत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, यामुळे त्यांना पुन्हा चौकशीकरिता बोलाविण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.
=========
चौकट
चार महिन्यात एकही अटक नाही
गुन्हा दाखल होऊन चार महिने उलटले. या गुन्ह्याचा तपास सुरुवातीला गंगापूर पोलीस ठाण्याकडे होता. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करीत असताना एसआयटी स्थापन झाली. एसआयटीने प्रथमच आ. बंब यांना गंगापूर पोलीस ठाण्यामार्फत निरोप देऊन चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश दिले होते.