वाळूज महानगर : दोन घरे फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह चार लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना आज दुपारी बजाजनगरमधील साराभूमी अपार्टमेंट येथे घडली. आज दुपारी १२.३० ते २ वाजेदरम्यान चोरट्यांनी बजाजनगरातील साराभूमी अपार्टमेंटमधील बी विंगमधील घर नंबर ६ व ७ मध्ये घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. दीपक जनार्दन अत्तरदे यांच्या ७ नंबरच्या घरातील कपाट तोडून ५०० रुपये रोख रकमेसह अंदाजे ४ लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. घराचे दार उघडे पाहून शेजारच्या लोकांनी घरमालकाला याची माहिती दिली. घरमालकांनी घराची पाहणी केली असता चोरी झाल्याचे दिसून आले. दीपक अत्तरदे यांनी या घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. श्वान जागेवरच गोल-गोल फिरत असल्याने चोरटे मोटारसायकलवरून आले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ६ नंबरच्या घराचे मालक गावी गेले असल्याने त्यांच्या घरातील किती व कोणता मुद्देमाल चोरी झाला याची माहिती समजू शकली नाही. दरम्यान, वाळूज औद्योगिक क्षेत्रात चोरी, घरफोडीच्या घटनांत वाढ झाली असून, या घटना रोखण्यात वाळूज एमआयडीसी पोलीस अपयशी ठरले आहेत. या वाढत्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.